

Pune News : लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या डिलिमिटेशन मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राजकीय चर्चा रंगली असतानाच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबातही यावरून मतभिन्नता समोर आली आहे. आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाने पाठिंबा देण्याच्या संभाव्य भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना, 'नवीन जनरेशन आहे. ती लंडनवरून परत आल्यानंतर तिला समजावण्याचा प्रयत्न करणार,' असे म्हटले आहे.
नताशा आव्हाड यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत डिलिमिटेशन विधेयकाला विरोध दर्शवला होता. 'माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते,' अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक असली, तरी प्रस्तावित विधेयकाच्या माध्यमातून विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखे असल्याचे म्हणत पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
नताशा यांच्या या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य भूमिकेवर नव्याने चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर नताशा यांनी केलेल्या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले.
दरम्यान, पुण्यात पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी, 'नवीन जनरेशन आहे, यावर काय बोलणार? सध्या ती लंडनला आहे. ती परत आल्यानंतर तिला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे,' अशी प्रतिक्रिया दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.