
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणात पाच जणांवर 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पण यातील काही टवाळखोर हे शिवसेनेशी संबंधित असल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले. मुक्ताईनगरमध्ये मागील चार-पाच वर्षांपासून गुंडगिरी, गुन्हेगारी वाढल्याचे आरोप झाले. दोन-अडीच वर्षांत एका राजकीय पक्षातील गुंडांना वाचविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन यायचे असा धक्कादायक दावा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.
तर या गुंडगिरीला कुणाचे तरी राजकीय पाठबळ असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या. त्याचवेळी दुर्देवाने हे सगळे एका विशिष्ट पक्षाशी संबंधित लोक आहेत, असे म्हणत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही कबुली दिली. या सगळ्यांच्या टीकेचा रोख हा थेटपणे शिवसेनेकडेच होता. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच. पण या प्रकरणामुळे आणि आरोपांमुळे मुक्ताईनगरमधील खडसे विरुद्ध शिवसेना हा जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादाचे मूळ हे अगदी तीन दशके जुने आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
एकनाथ खडसे हे आज अस्तित्वासाठी झटत असलेले नेते असले तरी एकेकाळी अखंड जळगाव जिल्हा त्यांच्या पंखाखाली होता. भाजपचेही खडसे म्हणतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण, असे समीकरण होते. सहाजिकच खडसे यांना मुक्ताईनगरमध्येही एकहाती वर्चस्व हवे होते. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद तोडकी होती. त्यामुळे खडसे यांच्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष हा शिवसेनाच होता. त्यातूनच त्यांनी शिवसेनेला कायम राजकीय शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जळगावमध्ये शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि खडसे एकमेकांचे कायम विरोधक राहिले.
1990 च्या दशकात शिवसेनेचे जळगावचे नेते सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक होते. कालांतराने ही जागा गुलाबराव पाटील यांनी घेतली. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिवसेना (Shivsena) आणि भाजपा विरोधातच लढायचे. जळगाव महापालिकेत भाजप सत्ताधारी होता तेव्हा शिवसेना पक्ष विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावायचा. एकवेळ अशी आली की जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आले होते. त्यामुळे राज्यात एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपचे जिल्ह्यात काही जमत नव्हते. शिवसेनेला मदत करायची वेळ आली की खडसे मागे हटतात असा आरोप त्यांच्यावर व्हायचा.
खडसे विरुद्ध शिवसेना हा वाद खऱ्या अर्थाने वाढला तो 2010 नंतर. 2010 च्या विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे विरूद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. त्याला शिवसेनेच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी खतपाणी घातल्याचे सांगितले जाते. तिथून शिवसेना आणि खडसे यांच्यातील वैर वाढतच गेले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली. या घटनेचे खलनायक शिवसेनेने खडसे यांना ठरविले. त्यावेळी खडसे यांना पराभूत करायचेच असा चंग ठाकरे यांनी बांधला. त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत निंबा पाटील यांना मैदानात उतरविले.
मुक्ताईनगर मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. युती तुटण्यास कारणीभूत असल्याचा आरोप करत खडसेंना पराभूत करण्याचे आवाहन केले. त्यावेळी खडसे पराभूत झाले नाहीत पण त्यांचे मताधिक्य घटले. 2015-16 मध्ये खडसे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतरच्या सामना अग्रलेखात ठाकरे यांनी खडसे यांना ठाकरी शैलीतूीन बाण मारले. मुक्ताईनगरातील शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना 'खतम' करण्यासाठी ज्या सत्तेचा गैरवापर केला, तीच सत्ता आज खडसे यांच्यावर उलटली आहे. उपेक्षा, मानहानीच्या भट्टीत त्यांना भाजून काढीत आहे. या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते. खडसे तेच कर्मफळ भोगीत आहेत, असा सणसणाीत टोला खडसे यांना लगावला होता.
खडसे यांना सर्वात मोठा झटका बसला तो 2019 मध्ये. भाजपने एकनाथ खडसे यांची उमेदवारी कापून मुलगी रोहिणी खडसे यांना दिली. त्यावेळी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत चंद्रकांत निंबा पाटील अपक्ष मैदानात उतरले. नाथाभाऊंच्या एककल्ली राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेक नेत्यांनी रसद पुरवून चंद्रकांत निंबा पाटील यांना निवडून आणले. अटीतटीच्या लढतीत रोहिणी खडसे 1हजार 989 मतांनी पराभूत झाल्या. तिथून खडसे विरुद्ध शिवसेना वाद हा वैयक्तिक झाला.
एकमेकांवर खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. अगदी विनयभंगाच्या तक्रारी झाल्या. आमदारांचे रेतीचे, सट्टा, जुगार, पत्त्याचे धंदे आहेत, असे आरोप रोहिणी खडसेंकडून झाले. आमदाराला चोपून काढून इथपर्यंत गोष्टी गेल्या. या गोष्टी विधानसभेत मांडताना मला आत्महत्या कराविशी वाटतेय, अशी उद्विग्नता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही रक्षा खडसे यांच्या प्रचारात शिवसेनेने फारशी सक्रियता दाखवली नव्हती. सुरुवातीला तर शिवसेना कुठेच दिसत नव्हती. पण वरिष्ठ नेत्यांचे आदेश आल्यानंतर कार्यकर्ते दिसू लागले.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. आता याच पक्षीय वादाने खालचे टोक गाठले आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीची ज्या टवाळखोरांनी छेड काढली त्यांचे शिवसेनेसोबत कनेक्शन असल्याचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या छेडछाड प्रकरणाने खडसे विरुद्ध शिवसेना या जुन्या वादाला नव्याने फोडणी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.