

रत्नागिरीत भाजप आणि राष्ट्रवादीकडून “स्वबळाचा नारा” दिल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याला थेट विरोध दर्शवला.
राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण देत सांगितले की, आगामी स्थानिक निवडणुका महायुतीतूनच लढवल्या जातील.
काही मंडळी जाणूनबुजून अफवा पसरवत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
Ratnagiri News : कोकणातील रायगड प्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात कलगितूरा रंगला आहे. आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर येथे मध्यंतरी महायुतीतील तिन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात होता. यावरून येथे वाद उफाळला आणि शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी मित्र पक्षांची खुमखुमी काढली. यामुळे वाद वाढतच गेल्याचे दिसून आले आहे. पण आता स्वबळाचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादीने काही मंडळी जाणूनबुजून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची अफवा उठवत असल्याचे म्हटले आहे. या स्पष्टीकरणामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आमदार शेखर निकमच तोंडावर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यात आगामी स्थानिकसाठी महायुतीतीकडून रणनीती आखली जात आहे. शिवसेना महायुती म्हणूनच लढणार असल्याचे शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाम सांगितले आहे. तर त्यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या प्रशांत यादव यांना निशान्यावर घेत खडेबोल सुनावले होते. त्यांनी, जर कोणाला खूमखुमी असेलच तर आमचा धनुष्यबाण कसा चालतो हे त्यांना दाखवावे लागेल अशा शब्दात फटकारले होते. ज्यानंतर जेष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना, स्थानिक पातळीवर केलेल्या वक्तव्यांना सिरीयस घ्यायचे नसते, असे बोलत याकडे कानाडोळा केला होता. या वार-पलटवारामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व पंचायत समिती माजी सदस्य जाकीर शेकासन पक्षाची भूमीका स्पष्ट केली आहे. त्यांनी, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतून लढणार आहे. मात्र काही मंडळी जाणूनबुजून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची अफवा उठवत असल्याचे म्हटले आहे.
तसेच त्यांनी, आगामी निवडणुका या आम्ही महायुतीमधूनच लढणार असून आमदार शेखर निकम व बाबाजीराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची सत्ता स्थापन येईल. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल असे म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महायुती म्हणूनच निवडणूक लढतील. आमदार निकम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे मेळावे बैठका विभागवार घेण्यात येत असून, निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
या दरम्यान, कार्यकर्त्यांची मते व विचार आजमावण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये महायुती करू नका किंवा स्वबळाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आमदार निकम महायुतीमधूनच निवडणूक लढवण्याची रणनीती आखून मोर्चेबांधणी करत आहेत. महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत यासाठी ते प्रत्येक विभागात बारकाईने व अभ्यासपूर्ण आखणी करत आहेत. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच बाजी मारेल, असा विश्वास शेकासन यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल असेल. चिपळूण नगरपालिका व देवरूख नगरपंचायतीचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल; परंतु याचा अंतिम निर्णय महायुतीमधील नेते घेतील. कुठेही वादाचा मुद्दा असणार नाही. सर्व जागांचा निर्णय समन्वय व सामंजस्याने घेण्यात येईल. विरोधकांना याची काळजी घेण्याची गरज भासणार नाही, असेही शेकासन यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी, राजापूर, लांजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, अनेकांनी आपली नावे उमेदवारीसाठी दिली आहेत. ही नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, आमदार शेखर निकम व अन्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जिल्ह्यात निवडणुकीच्या कामाला लागले आहेत, असे शेकासन यांनी सांगितले.
1️. उदय सामंत यांनी कोणत्या विषयावर विरोध व्यक्त केला?
भाजप आणि राष्ट्रवादीच्या “स्वबळाचा नारा” देण्याच्या भूमिकेला त्यांनी थेट विरोध केला.
2️. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे?
राष्ट्रवादीने स्पष्ट केले की, स्थानिक निवडणुका महायुतीतूनच लढवल्या जातील.
3️. कोणत्या निवडणुकांबाबत हा वाद आहे?
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.
4️ .अफवा कोणत्या संदर्भात पसरवल्या गेल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची चुकीची माहिती काही मंडळींनी पसरवली.
5️. या घडामोडींचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
मahayutiमध्ये एकात्मतेचा संदेश जाण्याची शक्यता असून विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.