Guhagar News : भारतीय जनता पक्षाला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र, शिवसेनेला हरवणे तुमच्या बापाला जमणार नाही. वर्षभरानंतर आमचे दिवस येतील, त्या वेळी तुमचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमधील मेळाव्यात केले. (BJP wants to create riots in this country : Bhaskar Jadhav)
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नेतृत्वात शिवसेनेने (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे ) निषेध मोर्चा काढला होता. शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार असो, ५० खोके खातात बोके, अदानी अंबानी तुपाशी, जनता मरते उपाशी आदी घोषणा देत हा मोर्चा गुहागर तहसीलदार कार्यालयावर येऊन धडकला. आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन दिले. त्यानंतर भंडारी भवन येथे मेळाव्यात ते बोलत होते.
जाधव म्हणाले की, गेल्या काही वर्षात मोर्चा, आंदोलने झाली; पण त्यात माझा सहभाग नव्हता. मी विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देत असतो. अनेक वर्षांनी आज मोर्चात सहभागी झाल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गुहागर तालुक्यात पूर्वीची शिवसेना पुन्हा एकदा उभी करू शकलो, याचे समाधान आज मला आहे.
सर्व ठेकेदार त्यांच्या पसंतीचे हवेत म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि अन्य नेते विकासकामांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. जलजीवनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना निधी देणे थांबवले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या माझ्या दीडशे कोटींच्या कामांना मिंधे सरकारने स्टे दिला आहे. हा स्टे उठवावा म्हणून आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असेही भास्कर जाधव यांनी ठणकावले.
चाळीस आमदार, १३ खासदार फोडूनदेखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना वाढत आहे. ही खरी भाजपची डोकेदुखी आहे. भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मुस्लिम समाजाने डोकी भडकवून घेऊ नका. तुम्ही त्यांचा हेतू यशस्वी करता आहात. त्यांना औरंगजेबाच्या नावाने राजकारण करायचे आहे. हिंदू, शीख, इस्लाम, इसाई यांच्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला.
मतदारसंघात कोणीही येऊद्या; जनता माझ्या पाठीशी
मी महाराष्ट्रात फिरणार आहे, त्या वेळी नारायण राणे, उदय सामंत, रामदास कदम, भाजपचे अन्य नेते माझ्या मतदार संघात कितीही वेळा येऊद्यात. माझ्या मतदार संघातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ही जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वासही भास्कर जाधव यांनी या वेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.