Shetkari Kamgar Party : महाराष्ट्र दणाणून सोडणाऱ्या 'शेकाप'ची धुळधाण... 'सगळ्यांनी' मिळून काढला काटा!

Shetkari Kamgar Party | Jayant Patil : फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची पार्श्वभूमी असलेला शेतकरी कामगार पक्ष आता अखेरची घटका मोजताना दिसत आहे. त्यातही हक्काचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात शेकापची अक्षरशः वाताहात झाली आहे.
Shetkari Kamgar Party
Shetkari Kamgar PartySarkarnama
Published on
Updated on

Shetkari Kamgar Party : फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची पार्श्वभूमी असलेला शेतकरी कामगार पक्ष आता अखेरची घटका मोजताना दिसत आहे. त्यातही हक्काचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात शेकापची अक्षरशः वाताहात झाली आहे. शेकापचे अनेक वर्षे एकहाती नेतृत्व करणाऱ्या माजी राज्यमंत्री दिवंगत मीनाक्षी ताई पाटील यांचेच घर फुटल्याने खोडावरच घाव बसला आहे. युती-आघाडीच्या राजकारणात शेकापचा निभाव लागला नाही. बदलती राजकीय भूमिका, नेतृत्वाचा अभाव, लोकांच्या मुलभूत समस्यांपासून घेतलेली फारकत अशा अनेक कारणांनी शेकापची धुळधाण झाली. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अन् भाजप या मातब्बर पक्षांच्या राजकीय घुसळणीतही या पक्षाची माती झाली.

शेकापचा इतिहास पाहिल्यास एकेकाळी हा पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष होता. त्यानंतरच्या काळातही शेकापने आपली ताकद टिकवून ठेवली होती. लाल बावट्याचा आवाज लोकसभेपासून राज्याच्या विधिमंडळात आणि रायगड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात घुमत होता. 1957 साली शेकापच्या सर्वाधिक 31 आमदारांनी राज्याची विधानसभा दणाणून सोडली होती. तर 1977 साली शेकापचे सर्वाधिक पाच खासदार लोकसभेवर निवडून गेले होते. रायगडची जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती अनेक वर्षांपासून शेकापकडे होत्या.

पण आज घडीला सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख हे एकमेव आमदार वगळता शेकापची विधिमंडळात ताकद राहिलेली नाही. यासाठी पक्षाची मागील काही वर्षातील धरसोड वृत्तीच जबाबदार म्हणायला हवी. शेकापची स्थापनाच काँग्रेसविरोधी विचार म्हणून झाली होती. डाव्या विचारसरणीची कास धरून पक्षाची वाटचाल सुरु झाली. पण सत्तेसाठी कधी शिवसेनेसोबत युती, तर कधी शिवसेनेला विरोध केला गेला. आता नव्या ‘इंडिया’ आघाडीत शेकाप पुन्हा काँग्रेस, कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. त्यामुळे पक्षाची नेमकी विचारधारा कोणती हेच स्पष्ट होत नाही.

Shetkari Kamgar Party
Raigad Politics : जयंत पाटलांचं घर फुटलं, धसका राष्ट्रवादीला : भाजप जिल्हा परिषद स्वबळावर काबीज करणार?

याशिवाय राजकीय धोरणांचा आभाव, शेतकऱ्यांसाठीची कमी झालेली रस्त्यावरची लढाई, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची ढळलेली निष्ठा, त्यांना भासलेली सत्तेची गरज अशा गोष्टी कारणीभूत म्हणता येतील. यामुळे शेकाप कायमच हेलकावे खात राहिला. पण शेकापचे अस्तित्व कमी व्हायला जेवढा पक्ष जबाबदार आहे, तेवढेच भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही तेवढेच जबाबदार आहेत. या सगळ्या प्रमुख पक्षांनी मिळूनच हळू हळू शेकापचा घास गिळला असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

शेकापच्या अनेक पदाधिकाऱ्यांना सत्तेची गरज भासू लागली. कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी, गटाचे राजकारण टिकवण्यासाठी सत्ता हवी हवीशी वाटू लागली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांनी ही गरज पूर्ण केली. त्यातून अनेक माजी आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी शेकापला राम राम केला. शेकापला विभाजनाचा पहिला फटका संस्थापकांनीच दिला. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, तुळशीदास जाधव हे तिघेही काँग्रेसमध्ये परत गेले.

त्यानंतरच्या काळात कल्याणचे कृष्णराव धुळप भाजपवासी झाले. मागील काही वर्षांत पेणमधून रवीशेठ पाटील, धैर्यशील पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आज रवीशेठ पाटील भाजपचे आमदार आणि धैर्यशील पाटील राज्यसभेवर खासदार आहेत. अलिबागचे दिलीप भोईर यांनीही शेकापला दणका दिला. माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांनी शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पनवेल आणि उरणमध्ये तर पक्ष अस्तित्वहिनच झाला. पनवेलमध्ये सत्तेत असणारा पक्ष विरोधी पक्षात बसू लागला.

Shetkari Kamgar Party
Raigad : गोगावलेंचं 'पालकमंत्रिपदाचं' स्वप्न धुळीस! फडणवीसांची राष्ट्रवादीसाठी बॅटिंग, शहांकडे टाकला शब्द!

उरणचे शेकापचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विवेक पाटील यांच्यावर कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेतला. त्यामुळे मधल्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. शेकापची मुरूड मधील ढाल असलेले मनोज भगत यांनी सुद्धा पक्षाची साथ सोडून सुनील तटकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणं पसंद केले. स्वतः जयंत पाटील हेही अनेक वर्षे विधान परिषदेवर होते. पण गतवर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळे त्यांचा विधान परिषद निवडणुकीलाही पराभव झाला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलिबागमधून दिलीप भोईर यांनी बंडखोरी केली. त्यांनी 33 हजार मतं घेतली. ती मते शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना जिंकण्यासाठी आवश्यक होती. आता सुभाष पाटील आणि आस्ताद पाटील यांनीही साथ सोडली आहे. या घडामोडींचा रायगड जिल्ह्याच्या सत्ता समीकरणांवरही मोठा परिणाम होणार आहे. पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

2017 सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापने 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 3 जागा मिळवता आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीबरोबर युती शेकापने सत्ता मिळवली होती. आता आताची स्थिती भाजपला पोषक असून, हीच संख्या 30 पेक्षा जास्त जाऊन भाजप एकहाती सत्ता मिळवेल, असा विश्वास भाजपचे दक्षिण रायगड प्रमुख अॅड. महेश मोहिते यांचा आहे.

मीनाक्षी पाटलांच्या निधनाने न भरून येणार नुकसान :

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील या जयंत पाटील आणि सुभाष पाटील यांच्या बहीण होत्या. त्यांचे गतवर्षी निधन झाले. पक्षाच्या बांधणीमध्ये त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. एकाच कुटुंबात अनेक राजकीय पदे असल्याने कुटुंबात नेहमीच वाद व्हायचा. पण या वादात मिनाक्षी पाटील नेहमी सामंजस्याची भूमिका घ्यायच्या.

पण मीनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर या कुटुंबातील वाद विकोपाला गेला. विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली. सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली.

त्यामुळे नाराज झालेले सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. त्याचा परिणाम निवडणुका निकालावर झाला. पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील यांना महागात पडली. शिवसेनेचे महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. आता याच नाराजीचा स्फोट झाला असून हा वाद पक्षाच्या फुटीपर्यंत येऊन पोहोचला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com