
अलिबाग येथे RCF कंपनीविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू असून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे आंदोलन आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आता त्याला हिंसक वळण लागले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Raigad/Alibag News : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आरसीएफ कंपनी विरोधातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आंदोलन सुरू केलं आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने या आंदोलनास हिंसक वळण लागले असून कंपनीच्या बाहेरील रस्त्यावर टायर जाळून शिवसेनेने कंपनी आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचेही आता समोर येत आहे.
शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणे, प्रदुषण, परिसरातील रस्ते आदी समस्यांविरोधात आंदोलन केले. तसेच रस्ता रोकोही करण्यात आला. यावेळी आमदार दळवी यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी अडवले.
त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. यामुळेच खवळलेल्या शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरत जोरदार घोषणा देत रस्त्यावर टायर जाळून शिवसेनेने कंपनी आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला आहे.
दरम्यान आता शिवसैनिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करू, 15 आणि 16 तारखेला साखळी उपोषण, तर 17 ऑक्टोबरला संपूर्ण अलिबाग बंद व चक्काजाम आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला होता.
तर या आंदोलनानंतर निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला RCF प्रशासन जबाबदार राहील, असाही इशारा आमदार दळवींनी दिला होता. पण आजच्या ठिय्या आंदोलनालाच हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे.
अलिबागनजीक थळ येथील आरसीएफ प्रकल्प सुरू होऊन 36 वर्षे झाली. 141 भूमिपुत्रांच्या जमीन या कंपनी करता घेण्यात आल्या होत्या. शासनाच्या कायद्याप्रमाणे भूमिपुत्रांना तातडीने नोकरी सामावून घ्यायला हवे होते.
मात्र कंपनी प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळं आजतागायत प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही. यामुळे शेतकरी, मच्छिमारांच्या स्थानिक सुविधांसाठी विविध पक्षांच्या नेत्यांनी आंदोलने केली. मात्र कंपनी प्रशासनाने हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आल्याचा आरोप दळवी यांनी केला आहे.
यावेळी दळवी यांनी आरसीएफ कंपनीवर आरोप करताना जोरदार टीका केली आहे. त्यांनी या आदोलनातील हिंसक वळणाला कंपनीला जबाबदार धरले असून या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाकरता मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या दालनात एक बैठक पार पडली होती.
त्यावेळी देखील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले होते. त्यावेळी फडवणीस यांनी लेखी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. ज्याला राज्यसभा सदस्य जे. पी. नड्डा यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेऊन भूमिपुत्रांना न्याय देऊ असे म्हटले होते. पण अद्याप या भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही, असा आरोप आमदार दळवी यांनी केला आहे.
प्र.१: अलिबागमध्ये कोणत्या कारणासाठी आंदोलन सुरू झाले?
👉 RCF कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांना नोकरी न दिल्याचा आरोप करत आंदोलन सुरू झाले.
प्र.२: हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले?
👉 हे आंदोलन शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
प्र.३: आंदोलनाला हिंसक वळण लागले का?
👉 होय, आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे.
प्र.४: कोणत्या पक्षाच्या वतीने आंदोलन झाले?
👉 एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
प्र.५: या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असू शकतो?
👉 सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यास शिवसेना आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.