
रायगडमध्ये शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना कार्यक्रमातून डावलल्याने वाद निर्माण झाला आहे.
गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंवर थेट टीका करत ‘आम्ही बनवाबनवी करत नाही’ असा टोला लगावला आहे.
या वक्तव्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव वाढू शकतो.
Raigad News : रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू झालेला वाद आता एकमेकांना विकास कार्यक्रमात न बोलावण्यापर्यंत गेला आहे. काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गोगावले यांना रायगडमध्ये विविध कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून डावलण्यात आले होते. त्यावरून वाद सुरू झाला होता. हा वाद मिटण्याच्या आधीच पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बायपास कामांच्या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी गोगावले यांचे नाव वगळले. या वादाच्या दरम्यानच आता राष्ट्रवादीला खिंडार पाडत गोगावलेंनी तटकरेंवर प्रहार केला आहे. तसेच, आम्ही बनवाबनवी करत नाही. म्हणूनच मतदार आकर्षित होतो असाही टोला लगावला आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्र्यांना न बोलावणे, कोणशिलेवर नावाचा उल्लेख न करणे अशा विविध कारणांसह पालकमंत्रीपदावरून देखील वाद सुरूच आहे. आता तर माणगाव आणि इंदापूर बायपास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात (3 ऑक्टोबर) भाजप नेत्यांना सोबत घेऊन शिवसेनेला डावलण्याची खेळी तटकरेंनी खेळली. यामुळे पुन्हा एकदा वगळल्याची चर्चा रंगली होत्या.
अशातच कोलाड विभागातील पुगांव येथे शिवसेनेच्या वतीने (शिंदे गटाच्या) आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी आंबेवाडी जि. प. मतदारसंघाचे माजी सदस्य व आदिवासी समाजातील उमदे नेतृत्व दया पवार, रोठ सरपंच गीता मोरे, जनार्दन मोरे यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबर फटका बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
याच कार्यक्रमात गोगवले यांनी खासदार सुनील तटकरे यांचा खरपूस समाचार घेतला. गोगावले यांनी, गोरगरिबांना नेहमी सहकार्य करतो, असे सांगत बनवाबनवी आमच्या रक्तात नाही. म्हणून कोणाला आम्ही फसवत नाही. आम्हाला खोटे आणि चुकीचे बोलायची सवयही नाही. म्हणून मतदार आपच्याकडे आकर्षित होत आहेत, असे म्हणत गोगावले यांनी तटकरे यांना डिवचले.
विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात एकमेकांना डावलने, महायुतीत असूनही एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना फोडणे, जाहीर प्रवेश कार्यक्रम करणे या गोष्टींमुळे आता रायगडमध्ये ‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’ वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महायुती कुठल्या मोडवर जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्र.1: भरत गोगावले यांनी कोणावर टीका केली?
👉 त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंवर टीका केली आहे.
प्र.2: वाद कशामुळे सुरू झाला?
👉 रायगडमधील विविध कार्यक्रमांमध्ये गोगावले यांना डावलल्यामुळे हा वाद उफाळला.
प्र.3: गोगावले यांनी काय वक्तव्य केले?
👉 त्यांनी म्हटलं, “आम्ही बनवाबनवी करत नाही, म्हणूनच मतदार आमच्याकडे आकर्षित होतात.”
प्र.4: या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव अधिक वाढू शकतो.
प्र.5: सुनील तटकरे कोण आहेत?
👉 ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.