

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.
ही घोषणा महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच करण्यात आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेने राजकीय कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Alibag News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सभापतींसह नगरपालिका, नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. गट आणि गणाच्या आरक्षणासह प्रभागाचेही आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे राजकीय पक्षांकडून आता मोर्चे बांधणीला वेग आला असून इच्छुकांनी देखील उमेदवारीसाठी जोर लावला आहे. अशातच रायगडमध्ये मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याचे उघड झाले आहे. येथे शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची घोषणा करत यादीच प्रसिद्ध केली आहे. यामुळे विरोधकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पक्ष प्रवेशाची स्पर्धा सुरू झाली आहे. अशातच येथे महायुतीची युती होणार नाही हे देखील आता स्पष्ट झाले आहे.
याचे स्पष्ट संकेत शिवसेनेनं दिले असून राष्ट्रवादीने देखील स्वबळाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. तर भाजपने शिवसेनेप्रमाणे युतीसाठी जागावाटपांचा प्रस्ताव राष्ट्रवादी समोर ठेवला आहे. पण हा प्रस्ताव देखील राष्ट्रवादीने नाकारला आहे. यामुळे येथे युती होणार नाही असेच आतातरी संकेत मिळत आहेत.
अशातच शिवसेनेने अलिबाग तालुक्यात निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाई केणी यांनी ही यादी प्रसिद्ध केल्याने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर मित्र पक्षांसह विरोधकांना देखील याचा धक्का बसला आहे.
केणी यांनी शिवसेनेने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे सांगत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांच्या या यादीत जिल्हा परिषद आंबेपूर गट 37 साठी रसिका राजभाई केणी यांचे नाव फिक्स आहे. पंचायत समिती आंबेपूर गण (61) साठी शैलेश दादा पाटील, भोमोली (कुर्डूस) पंचायत समिती गणासाठी (62) कृष्णा दादा लोहमी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
दरम्यान निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तोच केणी यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. मात्र शिवसेनेच्या या निर्णयामुळे अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल आता चांगलाच तापला आहे. तर या निर्णयावर अद्याप मित्र पक्षांसह विरोधकांकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण ती कोणती देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
1. कोणत्या पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अलिबाग तालुक्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
2. ही घोषणा कधी करण्यात आली?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच ही घोषणा करण्यात आली आहे.
3. यामुळे कोणत्या पक्षांवर परिणाम झाला आहे?
या निर्णयामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय दबाव निर्माण झाला आहे.
4. शिवसेनेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया काय आहेत?
राजकीय वर्तुळात ही चाल “कुरघोडी” म्हणून पाहिली जात असून महायुतीच्या अंतर्गत मतभेदांना चालना मिळाल्याची चर्चा आहे.
5. याचा स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
शिवसेनेचा हा निर्णय अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातील निवडणुकीत मोठा प्रभाव पाडू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.