
माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
त्यांनी जुन्या सहकार्यांसोबत पुन्हा राजकीय वाटचाल सुरू होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
मात्र, त्यांच्या प्रवेशावर शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
Sindhudurg News : तळकोकणात स्थानिकच्या तोंडावर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून माजी आमदार राजन तेली यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे तळकोकणातील राजकीय समिकरणे बदण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण या प्रवेशामुळे आता महायुतीतीच ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.
राजन तेली यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांचे शिवबंधन तोडून थेट शिंदेंचा भगवा हाती घेतला. या भगवा हाती घेतल्यानंतर तो आपण कधीच खाली ठेवणार नाही अशीही ग्वाहीहीव दिली. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिकच्या आधीच शिवसेना सिंधुदुर्गमध्ये मजबूत स्थितीत पोहचल्याचे बोलले जाऊ लागले होते. तर तेलींच्या प्रवेशामुळे शिंदेंनी एकाच वेळी भाजपसह ठाकरेंवर कुरघोडी केल्याचेही बोलले जात होते.
दरम्यान प्रवेशाच्या चार दिवसात तेलींनी थेट भाजप नेते नितेश राणेंवरच बँक घोटाळ्याचे आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली. ज्यानंतर नीलेश राणे कोणती भूमीका घेतात याकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. यानंतर नीलेश राणे यांच्या प्रतिक्रियेआधीच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आली होती. ज्यात त्यांनी तेलींना फटकारले होते. यामुळे जिल्ह्यात केसरकर यांना तेली शिवसेनेत आल्याचे खटकल्याची चर्चा रंगली होती. तोच आता तेलींच्या स्वागत समारंभाला केसरकर यांनी पाठ फिरवल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवी वावटळ उठवली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पक्षाबाहेर पडण्याचा माजी आमदार राजन तेली यांनी निर्णय घेतला. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत जुन्या सहकार्यांसोबत राजकीय वाटचाल सुरू होत असल्याचे समाधान व्यक्त केले. पण प्रवेशाच्या आधी मुंबई भेटीसाठी वेळ देणाऱ्या दीपक केसरकर यांना त्यांचा प्रवेश झालेला कदाचित पटलेलं नाही.
तेलींच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ते जिल्ह्यात येताच जोरदार घडामोडी घडल्या. त्यांचे शिंदेंच्या शिवसेनेनं आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दमदार स्वागत झाले. तेही सावंतवाडीतील दीपक केसरकर यांच्या कार्यालयातच. ज्या कार्यालयातून केसरकर यांनी वर्षभरापूर्वी तेलींना हारवण्यासाठी रणनीती आखली. आपला विजय खेचून आणला आता त्याच कार्यालयात तेलींचे स्वागत झाले. त्यावेळी मात्र केसरकर अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
विधानसभा निवडणूक काळात तेली यांनी केसरकर यांच्यावर निष्क्रिय आमदार म्हणून अनेकदा आरोप केले होते. यामुळे तेलींच्या प्रवेशानंतर केसरकर त्यांना जुळवून घेतील का? असा प्रश्न जिल्ह्यासह शिवसेनेत विचारला जात होता. पण यावर आमदार निलेश राणे यांनी, “केसरकर यांनी स्वतः तेलींच्या प्रवेशाचं स्वागत केलं असून त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल, असे भाष्य केल्याचे सांगत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
तर प्रवेशाच्यापूर्वी केसरकर यांनी तेलींच्या आरोपावर भाष्य करताना, काय अन् कितीही खोटे आरोप केले तरी सत्य समोर येतेच. यामुळे आपल्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष नाही. मी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केलेला नाही. तेली यांचा सावंतवाडी हा प्रदेश तो भाग नीलेश राणे यांचा आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले होते. पण आता जर त्यांच्या मनात द्वेषाची भावना नाही. तेलींचा सावंतवाडी हा राजकीय भाग नाही. मग केसरकर यांनी तेलींच्या स्वागला पाठ का केली. त्यांची अनुपस्थिती का? असे प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.
दरम्यान केसरकर यांचे काहीही म्हणणे असले तरिही तेलींचा प्रवेश म्हणजे फक्त पक्षबदल नसून तो आगामी राजकारणातील समिकरणांच्या बदलांची, वेगळ्या मोर्चे बांधणीच्या नव्या अध्यायाची नांदी असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर आता कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे राणे, केसरकर आणि तेली जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये कसे समन्ववयाने राजकारण करतात हे पाहण सुद्धा महत्वाच ठरणार आहे.
नीलेश राणेंची मुत्सद्दी चाल
नीलेश राणे यांनी ‘राजकीय समीकरणांचा पट’ पुन्हा एकदा नव्याने आखला जावा अशी काळजी घेतल मुत्सद्दी चाल खेळली आहे. ज्यात त्यांनी मित्रपक्ष भाजप व विरोधक उबाठा सेनेला धक्का देण्याचे काम केलं आहे. यामुळेच आता या सोहळ्यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ज्याला केसरकर यांनी स्वत:ला दोन हात लांब ठेवले.
जिल्ह्यातील राणेंचं वर्चस्व
एकीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेला भाजप जिल्ह्यात ‘मोठा भाऊ’ म्हणून वावरत असतानाच, आमदार निलेश राणे यांनी राजन तेलींचा अनपेक्षित शिवसेनेत प्रवेश घडवून आणत जोरदार धक्का दिला आहे. या प्रवेशामुळे आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. कारण “नारायण राणे यांचा उजवा हात आज माझ्या डाव्या बाजूला आला आहे.” असे सांगत नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील सत्तासमीकरणात आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे.
1. राजन तेली कोण आहेत?
राजन तेली हे महाराष्ट्रातील माजी आमदार असून शिवसेनेचे जुने नेते आहेत.
2. त्यांनी ठाकरे गट सोडण्याचे कारण काय दिले?
त्यांनी जुन्या सहकार्यांसोबत पुन्हा राजकीय वाटचाल करण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले.
3. त्यांनी कोणत्या गटात प्रवेश केला आहे?
राजन तेली यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
4. दीपक केसरकर यांचा या प्रवेशावर काय प्रतिसाद आहे?
अहवालानुसार, केसरकर यांना राजन तेलींचा प्रवेश पटलेला नाही आणि ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
5. या प्रवेशाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
शिंदे गटाला बळ मिळेल, परंतु अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.