

कागल मतदारसंघात शिवसेनेला पुन्हा बालेकिल्ला बनवण्याचा संकल्प उदय सामंत यांनी व्यक्त केला.
युवासेना मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि वीरेंद्र मंडलिक यांच्या भाषणामुळे पक्षात जोश वाढल्याचे सांगितले.
आगामी काळात जिल्हा भगवामय करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे.
Shivsena Expansion Plan News : ‘जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देत आगामी काळात जिल्हा भगवामय करण्याचा मानस आहे. कागलमधील शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरील उत्साह, वीरेंद्र मंडलिकांच्या भाषणातील जोश पाहता कागल मतदारसंघ शिवसेनेचाच बालेकिल्ला असेल,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. हमीदवाडा (ता. कागल) येथे कागल विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-युवासेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते.
दरम्यान नुकताच उदय सामंत यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेबाबत भाष्य केलं. अद्याप लोकसभेच्या निवडणुकीला तीन एक वर्षे बाकी असतानाच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. संजय मंडलिक यांचा पराभव का झाला? कशामुळे झाला? याची पुन्हा चर्चा करायची नाही, त्यात आता जाणारही नाही.
मात्र पुढील निवडणुकीत पक्षाची बांधणी चांगली व्हायला पाहिजे. तसे झाले तरच संजय मंडलिक यांचा दीड लाखांनी विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर हा विश्वास व्यक्त करताना आपल्याला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढायच्या असून त्या महायुती म्हणूनच लढायच्या असल्याचेही ते म्हणाले. तर एकाआर्थी मंडलिकच शिवसेनेचे उमेदवार असतील अशी घोषणाच केली होती.
या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या वक्तव्याची अद्याप चर्चा थंड झालेली नाही. तोच पुन्हा एकदा सामंत यांनी कागल विधानसभा मतदारसंघाबाबत भाष्य करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. सामंत यांनी, जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देत आगामी काळात जिल्हा भगवामय करायचे असल्याचे म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी महायुतीत सत्तेत असणाऱ्या मित्र पक्ष राष्ट्रवादीच्या मतदार संघावर आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
सामंत यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असणारा कागल विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचाच बालेकिल्ला असेल, असे प्रतिपादन केले आहे. यामुळे आता नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर यावेळी त्यांनी वीरेंद्र मंडलिक यांचे नाव घेतल्याने वेगवेगळे तर्क लावले जात आहे. यावेळी सामंत म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार कोल्हापुरातील शिवसैनिकांनी प्रभावीपणे युवापिढीपर्यंत पोहोचवला आहे. सध्या जिल्ह्यात गटतटाचे राजकारण वाढले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेना वाढविणे हेच ध्येय ठेवले आहे.’
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा कागल मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात येईल. यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज येथे लवकरच पक्षकार्यालयाचे उद्घाटन मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.’
नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका
‘१५ मे २०२२ रोजी मुरगूड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे तसेच राधानगरी येथे शाहू सृष्टीचे उद्घाटन तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते उपस्थित राहिले नसल्याचा संदर्भ देत मंत्री सामंत यांनी नाव न घेता टीका केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यावर प्रेम नसलेले नेते अशा ऐतिहासिक कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
1. उदय सामंत यांनी कागलबाबत काय विधान केले?
त्यांनी कागल मतदारसंघ पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
2. हा कार्यक्रम कुठे झाला?
हमीदवाडा, ता. कागल येथे शिवसेना-युवासेना मेळावा आयोजित करण्यात आला होता.
3. या कार्यक्रमात कोण उपस्थित होते?
वीरेंद्र मंडलिक, अर्जुन आबिटकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
4. शिवसेनेचे पुढील उद्दिष्ट काय आहे?
जिल्ह्यात भगवा फडकवून पक्षाचे वर्चस्व वाढवणे हे उद्दिष्ट आहे.
5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
यामुळे कागल आणि कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे राजकारण अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.