

Bharat Gogawale Appointed Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या महायुतीतील रस्सीखेचला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेले गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष आता संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्याकडेच हे पद कायम राहावे, अशी भूमिका होती. तर शिवसेनेचे भरत गोगावले आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हे पद गोगावले यांच्याकडे देण्याच्या मागणीवर ठाम होते. या परस्परविरोधी भूमिकेमुळे तब्बल दीड वर्ष हा निर्णय रखडला होता.
विधान परिषद निवडणुकीतच तिढा सुटल्याची चर्चा
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा हा वाद केवळ एका पदापुरता मर्यादित नव्हता. जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाचा प्रश्न त्यामागे होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे स्थानिक नेते यांच्यातील संघर्षामुळे हा तिढा अधिकच चिघळला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर या वादावर तोडगा निघाल्याची चर्चा होती.
तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद निवडणुकीतील विजयासाठी शिवसेनेकडून सहकार्य करण्यात आले आणि त्याच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनीही काही दिवसांपूर्वी रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळणार असल्याचा दावा केला होता.
गोगावले विरुद्ध तटकरे संघर्षाला आता पूर्णविराम?
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षात भरत गोगावले यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान गोगावले यांना मिळाल्यानंतरही पालकमंत्रिपदाची घोषणा न झाल्याने त्यांनी “कुठल्या देवाची नड आहे” असा सवाल केला होता. मात्र, त्याचवेळी वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याचे संकेतही त्यांनी दिले होते.
दुसरीकडे आदिती तटकरे यांनीही काही आठवड्यांपूर्वी, “भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील,” अशी भूमिका मांडली होती. तर “ठरलंय पालकमंत्री भरतशेठ, आता फक्त जॅकेट घालायचं बाकी आहे,” अशी मिश्किल प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार, नेत्यांकडून देण्यात येत होती. अखेर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.