सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक झाल्यानंतर कोकणातील राजकारण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून हा सर्व प्रकार झाला होता. शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांनी पत्रकार परिषद घेऊन राणे कुटुंबीयांना प्रत्युत्तर दिले होते. यावरून आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे सतीश सावंत यांच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे. गुन्ह्याच्या तपासातील गोपनीय माहिती उघड केल्याबद्दल सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राणेंनी केली आहे. राणेंनी तक्रारीत म्हटले आहे की, सावंत यांनी तपासातील गोपनीय माहिती उघड केली आहे. सावंत यांच्यासह त्यांना ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही थेट न्यायालयात दाद मागू.
सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील गोपनीय बाबी उघड केल्या, असा निलेश राणेंचा दावा आहे. तपासातील गोपनीय बाबी उघड करणे हा न्यायालयात अवमान आहे. ही माहिती खरी असल्यास ती सावंत यांच्यापर्यंत पोचलीच कशी? कोणत्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली? याची सखोल चौकशी करावी. न्यायप्रविष्ठ प्रकरणातील माहिती जाहीर केल्याबद्दल सावंत यांच्यावर न्यायालय अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे राणेंनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले होते की, संतोष परब याच्यावर हल्ला करण्यासाठी सचिन सातपुते आणि निलेश यांच्यात ओरोस येथे चर्चा झाल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे या प्रकरणात नितेश राणेंचा सहभाग समोर आला आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने (BJP) बाजी मारली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख व बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत (Satish Savant) हे ईश्वर चिठ्ठीवर पराभूत झाले होते. त्यावेळी आमदार राणे यांनी फेसबुकवर गाडलाच अशी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये सतीश सावंत यांच्या डोक्यावर राणेंनी पाय ठेवला आहे, असे व्यंगचित्र होते.
परब हल्ला प्रकरणी गायब असतानाही राणेंनी ही फेसबुक पोस्ट केली होती. आता राणे हे पोलीस कोठडीत असताना सावंतांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, जिल्हा बँकेच्या निकालानंतर माझी सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली. माझी जिरवल्याची व्यंगचित्रे पोस्ट केली होती. माझी जिरवताना आमदार नितेश राणेंना काल तुरुंगात रात्र काढल्यानंतर त्यांचीच कशी जिरली हे समजले असेल. केंद्रीय मंत्री नारायण रामे हे पुत्रप्रेमापोटी संसद आणि मंत्रालयाचे कामकाज सोडून कणकवलीत तळ ठोकून होते. आधीच्या लोकप्रतिनिधींनी असे कधीही केले नव्हते. कधी अधिकाऱ्यांवर चिखलफेक तर कधी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला अशा दहशतवादी कारवाया करणाऱ्या आमदाराला तुरुंगात जावे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.