

Ratnagiri News : राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच, ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत व संजय शिरसाट यांनी जाधव यांच्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले होते. आता पुन्हा एकदा उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना सूचक विधान केले आहे.
जूनमध्ये संजय शिरसाट यांनी, भास्कर जाधव यांचा झालेला अपमान महाराष्ट्राने पाहिला असून आता आणखी किती दिवस ते ठाकरेंसोबत राहतील, हे माहीत नाही, असे म्हटले होते. जाधव हा अपमान सहन करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले होते. तसेच ते लवकरच ठाकरेंची साथ सोडतील, असे संकेतही शिरसाट यांनी दिले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
या विधानानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले असून भास्कर जाधव आजही ठाकरेंसोबतच आहेत. अशातच आता पुन्हा एकदा ते ठाकरेंची साथ सोडतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर भाष्य करताना उदय सामंत यांनीही महत्त्वाचे विधान केले आहे.
सामंत रत्नागिरीत आले असताना पत्रकारांनी त्यांना भास्कर जाधव आणि त्यांच्यातील जवळीकतेबद्दल विचारले. तसेच ऑपरेशन टायगरच्या रणनीतीबाबतही प्रश्न उपस्थित केला. यावेळी सामंत यांनी, "भास्कर जाधव आणि माझी जवळीक जर वाढली असेल, तर तुम्हाला त्याची काय अडचण आहे? तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? मी त्यांच्या जवळ जाऊ नये, असे तुम्हाला वाटते का?" असे सवाल केले.
पुढे बोलताना सामंत म्हणाले की, आपण एखाद्याच्या मांडीला मांडी लावून बसलो म्हणजे ती व्यक्ती माझ्या सर्वच बाबी ऐकेल किंवा मी तिचे ऐकावे, असे राजकारणात होत नाही. राज्यातील रत्नागिरी जिल्हा हा राजकारणातील अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. एखाद्या कार्यक्रमाला आम्ही एकत्र आलो, एकमेकांचे कौतुक केले, तर कोणाच्या पोटात का दुखते, हेच कळत नाही.
मात्र, काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगत सामंत यांनी भास्कर जाधव हे आपल्यापेक्षा राजकारणातील अनुभवी असल्याचे म्हटले. त्यांना असा काही निर्णय घ्यायचा असेल, तर ते योग्य वेळी घेतील, असे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.