
रत्नागिरीत राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे शरद पवार यांना कोकणात मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांच्या पक्षात गळती सुरुच आहे.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही नेत्यांचे भाजपकडे वळणे ही निवडणुकीपूर्व राजकीय हलचाल मानली जात आहे.
Ratnagiri Politics News : काहीच दिवसांवर राज्यात आगामी स्थानिकच्या रणधुमाळी सुरूवात होणार आहे. त्याचे पडघम आतापासूनच वाजण्यास सुरूवात झाली असून राजकीय पक्षांसह नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. दरम्यान तळ कोकणातही सध्या नेत्यांनी राजकीय उलथापालथीला वेग आणला आहे. त्यामुळे रत्नागिरीत राजकीय वातावरण तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गळती लागली आहे. आता येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे. यामुळे स्थानिकच्या तोंडावर शरद पवार यांना मोठा धक्का मानले जात आहे. (Prashant Yadav’s exit from Sharad Pawar’s NCP SP in Ratnagiri to join BJP signals another major political shift in Maharashtra ahead of upcoming elections)
राज्यात सध्या स्थानिकच्या रणधुमाळीची तयारी केली जात आहे. पण भाजप आत्ताच आगामी विधानसभा निवडणुकीची पेरणी करताना दिसत आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार आत्ताच तयार ठेवण्याकडे भाजप लक्ष देत आहे. त्याच पार्श्वभूमिवर चिपळूणमध्ये देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेल्या विधानसभेला दिलेला उमेदवारच आता भाजपच्या वाटेवर आहे. यामुळे येथे राष्ट्रवादीला भगदाड पडल्याचे मानले जात आहे.
आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेत चिपळूणची निवडणूक रंगतदार आणि चुरशीची झाली होती. येथे राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत बघायला मिळाली होती. महायुतीकडून विद्यमान आमदार शेखर निकम यांना तिकीट देण्यात आले होते. तर त्यांच्याविरोधात नवी कोरी पाटी असलेले महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांना शरद पवार यांनी मैदानात उतरवले होते.
तर मतदारावेळी निकम आणि यादव यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला आणि महायुतीचे निकम यांनी बाजी मारली. त्यानंतर चिपळूणमधील राजकारण काहीसे थंडावले होते. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. स्थानिककडे लक्ष केंद्रीत करताना विधानसभेचे नियोजन आत्ताच केले जात आहे. शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी प्रशांत यादव यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र ऐन वेळी यादव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांचा येत्या काही दिवसात या नेत्याचा पक्षप्रवेश मुंबई येथे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर संगमेश्वर विभागातील श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वर देवस्थान येथून नव्या दमाने कामाला सुरवात केली जाणार असल्याचीही सध्या चर्चा सुरू आहे.
दरम्यान शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक चिपळूणमध्ये झाली. या बैठकीत शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, आपण चिपळूण व गुहागरकडे लक्ष देणार असल्याचे सांगून या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा आमदार विजयी होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणार, असे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेनं आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधवांच्या मतदारसंघात पेरणीकडे लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
अशातच शिवसेनेच्या मार्गावर असणारे यादव यांनी आपली वाटच बदलल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याचे आता नवी चर्चा सुरू आहे. तर एकाच नेत्यासाठी शिवसेना आणि भाजपा या महायुतीमधील पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप यादव हे भाजप प्रवेश करणार यावर पक्षातील वरिष्ठांकडून दुजोरा देण्यात आला नाही. तरीही सध्या या प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
प्र.1: प्रशांत यादव कोणत्या पक्षात जाणार आहेत?
उ: मिळालेल्या माहितीनुसार ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
प्र.2: यामुळे कोणाला राजकीय नुकसान झाले आहे?
उ: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोकणात मोठा धक्का बसला आहे.
प्र.3: हे पक्षांतर कधी होऊ शकते?
उ: अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु आगामी काही दिवसांत पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.