
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : ‘एप्रिल फुल आणि आमदार गुल’, अशा घोषणा देत येथील मोनोरेल, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन पंचायत समिती, एक लाख सेट टॉप बॉक्स आदी आश्वासनांचे काय झाले?, असा प्रश्न करत आज येथे उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Protest against Deepak Kesarkar in Sawantwadi on behalf of Thackeray group)
केसरकरांनी आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. गेली पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप करून यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाहीत, यासाठी ठाकरे गट प्रयत्न करणार असल्याचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.
मंत्री केसकरांनी आपल्या आमदारकीत तसेच मंत्रिपदाच्या काळात दिलेली व प्रत्यक्षात न आलेल्या विविध आश्वासने आणि घोषणांचा निषेध करण्यासाठी आज ठाकरे गटाच्या माध्यमातून येथील बसस्थानक परिसरात ‘एप्रिल फुल’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ढोल बडवून केसरकरांचा निषेध करण्यात आला. तालुकाप्रमुख राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
तालुका प्रमुख राऊळ म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे सावंतवाडी तालुक्यातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्या काळात विकासकामांना निधीही आला; परंतु ती विकासकामे अद्याप रखडली आहेत. यात दीपक केसरकर यांचे अपयश दिसून येते. त्यामुळे ती विकासकामे मार्गी लावण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले.
केसरकर ठेकेदारांना सुविधा देतात
केसरकर २०१७ मध्ये मंत्री असताना येथील बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी सात कोटींचा निधी मंजूर झाला होता; मात्र अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. त्यातील ५० टक्के काम झाले, ते सुद्धा चौकशी करण्यासारखे बोगस आहे. या सर्व प्रकारात ठेकेदाराचे लाड आणि जनतेचे हाल होताना दिसत आहेत. ठेकेदारांवर कारवाई करू असे केसरकर सांगतात. मात्र, अद्याप त्यांनी एकाही ठेकेदारावर कारवाई केली नाही. उलट ठेकेदारांच्या म्हणण्याप्रमाणे ते त्यांना सुविधा देतात, असे दिसून येते. हिंमत असेल तर केसरकरांनी पहिल्यांदा येथील बसस्थानकाचे काम पूर्ण करून दाखवावे; अन्यथा ज्या ठिकाणी विकासकामांची आश्वासने दिली, त्या ठिकाणी जाऊन ठाकरे गटाच्या माध्यमातून आंदोलने करणार आहोत.’’
केसरकरांच्या कार्यालयाला पोलिस बंदोबस्त
उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.