Mahayuti Conflict : रायगडमध्ये महायुतीत नवा राजकीय भूकंप? शिंदेंच्या शिलेदारानं थेट भाजपलाच डिवचलं; पेणचा आमदार बदलणार म्हणत बॉम्बच टाकला

Mahendra Dalvi On BJP : कोकणात गेल्या काही वर्षांपासून राजकीय शिमगा सुरू आहे. महायुतीमधील नेते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत शिंदे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रायगडमध्ये रंगला होता. आता रायगड जिल्ह्यात सेनाविरुद्ध भाजप असा नवीन सामना सुरू झाला आहे.
 Pen Assembly Constituency BJP MLA Ravi Patil; DCM Eknath Shinde
Pen Assembly Constituency BJP MLA Ravi Patil; DCM Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News : कोकणातील रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद सुरू असतानाच आता शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी भाजपविरोधातही अप्रत्यक्षपणे मोर्चा उघडल्याचे चित्र आहे. 'पेणचा आमदार बदलणार, तुम्ही काळजी करू नका,' असे विधान करत दळवींनी नवा राजकीय वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या विधानामुळे रायगडमधील महायुतीच्या राजकारणात आणखी एक संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष सुरू आहे. महायुतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेचे नेते सोडताना दिसत नाहीत.

पालकमंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून राष्ट्रवादी आणि तटकरे यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह पक्षातील इतर नेतेही शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार करत आहेत.

 Pen Assembly Constituency BJP MLA Ravi Patil; DCM Eknath Shinde
'ती व्यक्ती आपण नाही', दळवींच दानवेंना प्रत्युत्तर,Mahendra Dalvi, Ambadas Danve, Winer Session

तटकरे-दळवी संघर्षाने रायगडचे राजकारण तापले

आमदार महेंद्र दळवी यांनी यापूर्वीही सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तटकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना पक्ष वाढवण्याऐवजी त्यांनी स्वतःचे कुटुंब वाढवले, असा दावा दळवींनी केला होता. तसेच तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची उलटी गिनती सुरू झाली असून पुढचा खासदार आमचाच असेल, असा दावाही त्यांनी केला होता.

नुकत्याच माणगाव येथील एका कार्यक्रमात दळवींनी तटकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली होती. दळवी यांच्या टीकेला उत्तर देताना सुनील तटकरे यांनीही अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. कोण कितीही टीका करत असले, तरी त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. उलट आपण ती टीका एन्जॉय करतो. अशा टीकेची आपण दखल घेत नसून रायगडचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले होते. तसेच, पांडुरंगाने त्यांना क्षमा करावी, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

राष्ट्रवादीनंतर आता भाजपशीही संघर्षाची चिन्हे

राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता महेंद्र दळवींनी आपला मोर्चा भाजपकडे वळवल्याचे दिसत आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी अलिबागवर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम पेण विधानसभा मतदारसंघावरही असल्याचे सांगितले. 'येणारा आमदार हा पेण विधानसभा मतदारसंघातून बदलणार, तुम्ही काळजी करू नका,' असे मोठे विधान दळवींनी केले. विशेष म्हणजे, पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भाजपचे रवी पाटील आहेत. त्यामुळे दळवी यांच्या विधानाचा रोख भाजपच्या विद्यमान आमदारांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 Pen Assembly Constituency BJP MLA Ravi Patil; DCM Eknath Shinde
Ambadas Danve यांचा कॅश बॉम्ब, Mahendra Dalvi यांचा चेहरा आणि Fadanvis आणि Eknath shinde यांना सवाल

यावेळी दळवींनी पेणमधील राजकीय नेत्यांच्या कामकाजावरही भाष्य केले. 'तिथले नेते काय करतात, याची आपल्याला माहिती नाही,' असे म्हणत त्यांनी पेणच्या राजकारणावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्ष शमण्याची चिन्हे नसताना आता शिवसेना आणि भाजपमध्येही नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी चिघळणार का? राष्ट्रवादीपाठोपाठ आता भाजपही शिवसेनेच्या निशाण्यावर येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.