

Raigad Mahayuti Clash News : रायगड जिल्ह्यात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प आणि खालापूरमधील इथेनॉल कंपनीवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अनिकेत तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या राजकीय संघर्षात थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना थेट निवडणुकीच्या मैदानात उतरून सामना करण्याचे आव्हान दिले आहे.
त्यांनी, “एवढीच खुमखुमी असेल, तर आधी आमदारकीचा राजीनामा दे. मी माझ्या मुलाला तुझ्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे करतो,” असे आक्रमक विधान थोरवे यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यांच्या या आव्हानामुळे रायगडमधील महायुतीच्या घटक पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.
टोरंट आणि इथेनॉल प्रकल्पांवरून वादाची ठिणगी
कर्जतमधील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पातील वृक्षतोडीचा मुद्दा आणि खालापूर तालुक्यातील इथेनॉल कंपनीवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. टोरंट प्रकल्पाचे आमदार महेंद्र थोरवे समर्थन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे तसेच जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला.
केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा दावा करत, राष्ट्रवादी काँग्रेस आता विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली. प्रकल्प मान्य नसेल, तर राष्ट्रवादीने महायुती सरकारमधून बाहेर पडावे, असा टोलाही त्यांनी लगावला. इथेनॉल प्रकल्पासाठी खोटे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आल्याचा आरोपही थोरवे यांनी केला. तसेच अनिकेत तटकरे आणि त्यांच्या नातेवाईकांची या प्रकल्पात भागीदारी असल्याचा दावा त्यांनी केला. हे आरोप थोरवे यांनी केले असून, त्यावर संबंधितांची भूमिका स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.
अनिकेत तटकरेंची थोरवेंवर टीका
थोरवे यांच्या आरोपांना उत्तर देताना अनिकेत तटकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. “महेंद्र थोरवे घटकेत घोड्यावर, तर घटकेत गाढवावर असतात,” अशी टिप्पणी त्यांनी केली. सध्या थोरवे यांच्याकडे सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्यावर बोलण्याशिवाय दुसरे काम उरले नसल्याचा टोलाही तटकरे यांनी लगावला. या विधानानंतर थोरवे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. विधान परिषद निवडणुकीच्या काळात अनिकेत तटकरे यांनी आपल्याला तब्बल २५ वेळा फोन केल्याचा दावा त्यांनी केला. काम झाल्यानंतर तटकरे पाठीत वार करतात, असा आरोपही थोरवे यांनी केला.
“आमच्या शिवसेनेमुळे आमदार झालास”
अनिकेत तटकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना थोरवे यांनी त्यांच्या विधान परिषद निवडीचा मुद्दा उपस्थित केला. पक्षाच्या आदेशाचे पालन केल्यामुळेच अनिकेत तटकरे आमदार झाले, असा दावा त्यांनी केला. “तुझ्या आणि तुझ्या बापाच्या कर्तृत्वावर तू विधान परिषदेत निवडून गेलेला नाहीस. आमच्या शिवसेनेमुळे आमदार झालास, हे लक्षात ठेव,” असे थोरवे म्हणाले. तसेच, अनिकेत तटकरे यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आव्हान देत आपल्या मुलाला त्यांच्या विरोधात निवडणुकीत उभे करण्याची तयारी असल्याचे त्यांनी जाहीर केले. सुनील तटकरे यांनी मुलाला आमदार करण्यासाठी लाचारी पत्करल्याचा आरोपही थोरवे यांनी केला.
सुधाकर घारेंचा थोरवेंवर पलटवार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनीही थोरवे यांच्यावर टीका केली आहे. टोरंट कंपनीच्या बाजूने थोरवे भूमिका घेत असल्याचा आरोप करत, प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षतोडीच्या प्रश्नाकडे ते दुर्लक्ष करत असल्याचे घारे यांनी म्हटले. टोरंट प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय मुद्द्यांऐवजी थोरवे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करण्यात अधिक रस घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पर्यावरणाचा प्रश्न आणि महायुतीतील राजकीय संघर्ष यांची सरमिसळ केली जात असल्याचे घारे म्हणाले. सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांची नावे घेतल्याशिवाय थोरवे यांचा दिवस जात नाही, अशी टीका करत घारे यांनी प्रसिद्धीसाठी थोरवे या दोन्ही नेत्यांचा उल्लेख करत असल्याचा दावा केला. टोरंट पॉवर आणि इथेनॉल प्रकल्पांवरून सुरू झालेला हा वाद आता थेट नेत्यांमधील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. महायुतीतील या संघर्षाचा रायगडच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.