

Raigad News : देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात तब्बल ३ लाख ८२ हजार ८३१ मतदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादीत नाव असूनही नोटीस मिळाल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करण्यासाठी मतदारांची धावपळ सुरू झाली आहे.
देशभरात एसआयआर प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रक्रियेविरोधातील आंदोलनात तरुणांचाही सहभाग दिसून येत आहे. अशातच रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने मतदारांना नोटीस मिळाल्याने हा विषय चर्चेत आला आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव, तरीही नोटीस
मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदारांकडून गणना प्रपत्रे भरून घेण्यात आली. त्यानंतर मतदारांच्या नोंदींची २००२ च्या मतदार यादीशी जोडणी करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आणि प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
मात्र, प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट असतानाही रायगड जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ८३१ मतदारांना मतदारसंघनिहाय नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघातील १ लाख ५० हजार ४२४ मतदारांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने नोटिसा मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मतदारांची कागदपत्रांसाठी धावपळ
नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन बूथस्तरीय अधिकारी (BLO) त्यांचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित मतदारांच्या नोंदींबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, आवश्यक पुरावे गोळा करणे आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करणे यामुळे अनेक मतदारांची धावपळ होत आहे.
SIR नोटिसा पाठवण्यामागे नेमकी कारणे काय?
निवडणूक विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसांमध्ये विविध कारणांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वडील आणि मुलांच्या वयातील अंतरासंबंधी विसंगती, २००२ च्या मतदार यादीशी नोंदींची जोडणी करण्यात अडचणी, विवाहित महिलांच्या नावात झालेला बदल, मृत मतदारांच्या नोंदी, स्थलांतरित मतदारांच्या नोंदी आणि दुबार नोंद.
या कारणांमुळे संबंधित मतदारांच्या नोंदींची पडताळणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रारूप मतदार यादीत नाव असतानाही नोटीस का पाठवण्यात आली, असा प्रश्न काही मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्ह्यात मतदारसंघनिहाय किती नोटिसा?
उपलब्ध आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये बजावण्यात आलेल्या नोटिसांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
विधानसभा मतदारसंघ आणि नोटिसांची संख्या
पनवेल १,५०,४२४
कर्जत ३३,२९४
उरण ५८,६९८
पेण ३०,३८१
अलिबाग ४२,७४१
श्रीवर्धन २४,८६०
महाड ४२,४३३
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.