

MMRDA land acquisition : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा-साई-चिरनेर पट्ट्यात प्रस्तावित असलेल्या ‘तिसऱ्या मुंबई’च्या उभारणीला आता वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली असून, तब्बल 5 हजार एकर जमीन देण्यास जमीनमालकांनी सहमती दर्शवली आहे. यापैकी सुमारे 550 एकर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा एमएमआरडीएला मिळाला आहे.
मुंबई (Mumbai) आणि नवी मुंबईवरील वाढता ताण कमी करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि पेण तालुक्यांतील 123 गावांचा समावेश असलेले 323 चौरस किलोमीटर क्षेत्र विकसित करून नियोजित शहर उभारण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाला केएससी नवशहर असेही संबोधले जात आहे.
तिसऱ्या मुंबईसाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाला चालना देण्यात आली आहे. जमीनमालकांना मोबदल्याबरोबरच विकसित जमीन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे जमीनमालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी अनेक जमीनमालक पुढे येत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची (Farmer) संख्या मोठी असून, जमीन संपादनाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
जमीन संपादनासाठी एमएमआरडीएने सिडको आणि एमआयडीसीच्या मॉडेलचा आधार घेतला आहे. या पद्धतीनुसार जमीनमालकांना केवळ जमिनीचा आर्थिक मोबदला मिळणार नाही, तर विकसित जमीनही देण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पासाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणासह प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
एकीकडे जमीनमालकांकडून सहमती मिळत असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत असले, तरी दुसरीकडे कर्नाळा-साई-चिरनेर परिसरातील काही शेतकरी आणि ग्रामस्थांनी केएससी नवशहर प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. शेतकरी प्रतिनिधींच्या आरोपानुसार, त्यांच्या हरकतींवर योग्य प्रकारे सुनावणी न घेता सरकारने एकतर्फी भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेवरून आगामी काळात संघर्षाची शक्यता कायम आहे.
तिसऱ्या मुंबईसाठी जमीन उपलब्धतेची प्रक्रिया वेगाने पुढे जात असली, तरी प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा कितपत पाठिंबा मिळतो, यावर पुढील अंमलबजावणीची दिशा अवलंबून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.