

Ratnagiri News : अजितदादांच्या अपघाताला १० महिने उलटल्यानंतरही काही नेत्यांकडून घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यापाठोपाठ आता माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनीही तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजितदादांच्या कथित घातपातात तटकरे यांचा हात आहे का, असा सवाल उपस्थित करत कदम यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच सुनील तटकरे यांनी या मुद्द्यावरून आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. सुरुवातीला विलीनीकरणाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगणाऱ्या तटकरे यांनी नंतर, "दादांनी मला विलीनीकरणाबाबत सांगितले होते," असे म्हणत या चर्चांवर भाष्य केले होते. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांनी काही आमदारांशी गुप्तपणे संपर्क साधला होता. त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, अर्थखाते स्वतःकडे घ्यायचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा मिळवायचा होता, असा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला होता.
थोरवे यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच रामदास कदम यांनीही तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "तटकरे हे कोणाचेही होऊ शकत नाहीत. ते बेईमान माणूस आहेत," अशी टीका कदम यांनी केली. तसेच, अजित पवार यांच्या कथित घातपातामध्ये तटकरे यांचा हात आहे का, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. कदम यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
तटकरे यांच्याशी असलेल्या जुन्या राजकीय संबंधांचा उल्लेख करताना कदम म्हणाले, "भूतकाळात तटकरे यांच्या निवडणुकीत आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी मला तटकरे कोणाचेही होणार नाहीत, ते बेईमान आहेत आणि भविष्यात मदत करणार नाहीत, असा इशारा दिला होता. दुर्दैवाने, त्यावेळी मी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले."
विधानसभा निवडणुकीतही तटकरे यांनी योगेश कदम यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. "महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र असतानाही गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि भास्कर जाधव यांना छुपी मदत केली," असा दावा त्यांनी केला. त्यामुळे तटकरे यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. 'तू ज्या मेव्हण्याचा उल्लेख करतोस, त्याची माझ्या बाजूला बसण्याचीही लायकी नाही,' असेही कदम म्हणाले.
कोकणातील धरणांच्या मुद्द्यावरूनही रामदास कदम यांनी तटकरे यांच्यावर निशाणा साधला. कोकणातील १६ धरणांबाबत सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी पोयनाळ धरणाचा मुद्दा उपस्थित केला. अनेक वर्षांपासून या धरणाचे काम रखडल्यामुळे १४ गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले असून, याला संपूर्णपणे तटकरेच जबाबदार आहेत, असा आरोप कदम यांनी केला. सुनील तटकरे यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असा टोलाही त्यांनी लगावला. "हा माणूस अत्यंत महत्त्वाकांक्षी असून राजकीय स्वार्थासाठी काहीही करू शकतो," असे म्हणत कदम यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
दरम्यान, थोरवे यांनी दिवाळीच्या काळात केलेल्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्यातच आता रामदास कदम यांनीही तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.