

Raigad News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत निश्चितपणे चर्चा झाली होती, अशी जाहीर कबुली दिली. तसेच अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, असेही त्यांनी म्हटले.
तटकरे यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांच्यावर स्वकीयांसह शिंदेंच्या शिवसेनेकडूनही टीका केली जात आहे. आता कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्याबाबत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधून उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय खेळीमुळे त्यांचा डाव फसल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
तटकरे यांना नऊ महिन्यांनंतर अचानक साक्षात्कार कसा झाला? गेल्या सात महिन्यांतील त्यांची विधाने तपासली पाहिजेत. विलीनीकरणाच्या चर्चेवर पडदा टाका, असे तुम्हीच म्हणत होता. दादा गेले, तो विषय संपला असून आता कोणतीही चर्चा नाही, अशी भूमिका तुम्ही घेतली होती. आम्ही विलीनीकरणाबाबत बोललो, तेव्हा आम्हाला वेड्यात काढण्यात आले. तुम्हाला बोलायचे असेल तर वैयक्तिक बोला, असेही बजावण्यात आले होते, अशा शब्दांत मिटकरी यांनी तटकरे यांना सुनावले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील या अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरू असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते हवे होते.
मात्र, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय खेळीमुळे तटकरे यांचा हा डाव उधळला गेला, असा दावा थोरवे यांनी केला. इतकेच नव्हे, तर तटकरे हे विविध मुद्द्यांवर खोटे बोलत असून ते 'कपटी माणूस' असल्याची घणाघाती टीकाही थोरवे यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगडमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात तब्बल १३ बैठका झाल्या होत्या, असा दावाही महेंद्र थोरवे यांनी केला. सुनील तटकरे हे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते, मग विलीनीकरणासंदर्भातील या महत्त्वाच्या बैठकांमध्ये ते सहभागी का नव्हते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुरुवातीला विलीनीकरणाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे तटकरे सांगत होते. मात्र, आता अजित पवार यांनी आपल्याला विलीनीकरणाच्या चर्चेची आधीच कल्पना दिली होती, असे ते म्हणत आहेत. तटकरे यांनी घेतलेला हा अचानक यू-टर्न म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या आरोपांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.