

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली.
शिवसेना शिंदे गटाने आठ तालुक्यांत सभापती पद मिळवत मोठे वर्चस्व प्रस्थापित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चिपळूण येथे सभापती पद मिळाले आणि महायुतीने सर्व पंचायत समित्यांवर नियंत्रण मिळवले.
ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या नऊही तालुका पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया सोमवारी (ता. ९) उत्साहात पार पडली. यामध्ये शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ८ तालुक्यांत शिवसेनेचे, तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचा सभापती विराजमान झाला आहे. यामुळे आता जिल्ह्यासह राज्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी जे बोललं ते करून दाखवलं अशी चर्चा होताना दिसत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर होताच शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी टोकाची भूमिका घेत राष्ट्रवादीशी युती नाहीच अशी भूमिका घेतली होती. यामुळे आमदार शेखर निकम यांची उमेदवारांसाठी धावाधाव झाली होती. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) स्वतंत्र निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या. भाजप-शिवसेना युतीच्या (शिवसेना ४ आणि भाजपला ३) सात जागा आल्या. निवडणुकीत युतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला दरवाजे बंद केले होते परंतु सत्तेसाठी त्यांना राष्ट्रवादीलाच सोबत घ्यावे लागले.
जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने वर्चस्व राखले होते. ९ पैकी ८ ठिकाणी महायुतीचे प्राबल्य असताना चिपळूणच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर ताकद दाखवल्यामुळे तिथे समीकरणे बदलण्याची शक्यता होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी चर्चा होती.
मात्र, पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतर अखेरचा तिढा सुटला. ठरलेल्या सूत्रानुसार पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीला सभापतिपद, तर शिवसेनेला उपसभापतिपद देण्याचा निर्णय झाला. परिणामी, येथे राष्ट्रवादीचे सूर्यकांत खेतले सभापती, तर शिवसेनेचे संदेश आयरे उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून आले. या ठिकाणी ठाकरे शिवसेना आता विरोधात बसली आहे.
रत्नागिरी आणि लांजा येथे शिवसेना-भाजपची एकहाती सत्ता असल्याने निवडीत कोणतीही अडचण आली नाही. रत्नागिरीत सभापतिपदी प्रवीण पांचाळ, तर उपसभापतिपदी गजानन धनावडे यांची निवड झाली. लांजा तालुक्यात मानसी आंबेकर सभापती आणि आदेश आंबोळकर उपसभापती झाले.
संगमेश्वरमध्ये शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये सभापती झाल्या, तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल बाईत यांची निवड करण्यात आली. दापोली सभापतिपदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख उन्मेष राजे, तर नम्रता तोडणकर उपसभापती झाल्या. खेडमध्ये शिवसेनेच्या डॉ. अफिया पालेकर सभापती, तर सुनील मोरे उपसभापती झाले.
राजापूर आणि गुहागर पंचायत समित्यांमध्ये भाजपला उपसभापतिपदे देऊन युतीधर्म पाळण्यात आला. राजापुरात अपक्ष निवडून आल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या नंदिनी नितीन कदम यांना सभापतिपद देऊन सुखद धक्का देण्यात आला; तर भाजपचे अभिजित गुरव उपसभापती झाले.
गुहागरमध्येही युतीचा फॉर्म्युला यशस्वी ठरला असून, शिवसेनेचे प्रणव पोळकर सभापती; तर भाजपचे नीलेश सुर्वे उपसभापती बनले आहेत. मंडणगडमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने प्रणाली चिले सभापती व दीपक मालुसरे उपसभापती झाले.
पंचायत समिती एकूण - ९
सभापती
शिवसेना (शिंदे) - ८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १
उपसभापती
शिवसेना (शिंदे) - ६, भाजप उपसभापती - २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.