Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency : रत्नागिरी-सिंधुदुर्गात किंगमेकर किरण सामंत यांचे तळ्यात- मळ्यात..!

Lok Sabha Election 2024 : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे.
Kiran Samant
Kiran SamantSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ अधिक चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे या मतदारसंघातून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. किरण सामंत यांनी स्वत: आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले होते. किरण सामंत हे हे आजपर्यंत राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय नव्हते. पडद्यामागील राजकीय घडामोडींमध्ये किरण उर्फ भैय्या सामंत हे किंगमेकरच्या भूमिकेत राहिले आहेत.

ते 2004 पासून उदय सामंत यांच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले. उच्चशिक्षित, मितभाषी पंरतु मुत्सदी उद्योजक अशी भैय्या सामंत यांची रत्नागिरीत ओळख आहे. किरण सामंत हे भाऊ उदय सामंत यांच्यासोबत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणनीती आखण्यात सक्रिय होते. विरोधकांचे डावपेच हाणून पाडणे, विरोधकांची मते आपल्या बाजूला वळवणे, यासाठी किरण सामंत यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. त्यामुळेच त्यांना रत्नागिरीच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाते. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency)

किरण सामंत आणि उदय सामंत हे दोघे बंधू राजकारण आणि व्यवसाय या दोन्हींची सांगड घालण्यात यशस्वी झाल्याचे मानले जाते. उदय सामंतांच्या राजकारणात पडद्यामागील सर्व घडामोडींचे सूत्रधार किरण सामंत हेच मानले जातात. आता किरण सामंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. उदय सामंत यांनीही किरण सामंत यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी शिंदे गटाकडे फिल्डिंग लावली आहे. यापूर्वी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी शिदे गट ही जागा लढवणार आणि किरण सामंत हेच उमेदवार असणार, असे अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे.

त्यातच आपल्या कामाच्या जोरावर रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात ताकद निर्माण केल्यानंतर किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठाकरे गटाची मशाल ठेवत दबावतंत्राचा वापर केला होता. दुसऱ्यांदा त्यांनी मी किरण सामंत ...रोखणार कोण? अशा आशयाचे स्टेटस ठेऊन पुन्हा एकदा आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा इशाराच दिला आहे. त्यातच गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी किरण सामंत यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे, असा प्रश्न पडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kiran Samant
Sharad Pawar Vs Ajit Pawar Group : निकालानंतर जळगाव राष्ट्रवादीत भडका; शरद पवार गटाविरोधात गुन्हा

दरम्यान, या मतदारसंघात भाजपकडूनही तयारी करण्यात आली आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण, निलेश राणे, प्रमोद जठार यांची नावे पुढे येत आहेत. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळाली तर आपण त्यांचा प्रचार करणार असल्याचे वक्तव्यही किरण सामंत यांनी केले होते. मात्र जर पक्षाने आपल्याला संधी दिली तर मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे किरण सामंतांच्या मनात नक्की काय हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे आगामी काळात रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुतीत नाराजी नाट्यासह मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नाव (Name):

किरण रवींद्र सामंत

जन्मतारीख (Birth Date):

7 जानेवारी 1973

शिक्षण (Education):

सिव्हिल इंजिनीअरिंग

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background):

किरण सामंत हे एका सधन आणि उद्योजक कुटुंबातून आलेले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ते बंधू आहेत. त्यांचे वडील रवींद्र सामंत हे उद्योजक आहेत. किरण सामंत यांनी पुढे तो उद्योग-व्यवसाय वाढवण्याचे काम केले. किरण सामंत यांच्या मातोश्रींचे नाव स्वरूपा सामंत असे आहे. त्यांच्या पत्नीचे नाव वर्षा असून, या दांपत्यास अपूर्वा नावाची एक मुलगी आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business):

उद्योग

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency):

रत्नागिरी -सिंधुदुर्ग

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation):

शिवसेना (शिंदे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey):

किरण सामंत हे एक यशस्वी उद्योजक म्हणून रत्नागिरीत जिल्ह्यात परिचित आहेत. अपूर्वा रिबिल्ड प्रा. लि, आर. डी. सामंत कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि., तिर्था होम्स प्रा. लिमिटेड अशा सात कंपन्यांचे ते संचालक आहेत. किरण सामंत यांचा थेट राजकारणाशी संबंध नाही. ते 2004 पासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले आहेत. उदय सामंत यांच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात पडद्यामागचे सूत्रधार आणि किंगमेकर म्हणून आपली भूमिका निभावली आहे. 2004 च्या निवडणुकीत निर्णायक मते फिरवण्यासाठी किरण सामंत यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.

विरोधकांची मते फोडून विरोधकांच्या लोकांना आपलेसे करणे, मतदारसंघातील विकासकामे करण्यात निर्णायक भूमिका घेताना दिसून येतात. किरण सामंत हे सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच शिवसेना फुटीनंतर ते राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. शिवसेना फुटीनंतर उदय सामंतांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांना उद्योग खाते मिळावे, यासाठी किरण सामंताचीही भूमिका असल्याचे बोलेले जाते. याशिवाय त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून रत्नागिरी -सिंधुदुर्गातील राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपणही इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. किरण सामंत यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून त्यांनी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात आणले आहे. दरम्यान, किरण सामंत हे लोकसभेला इच्छुक असले तरी त्यांनी लांजा विधानसभा मतदारसंघावरही आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघातील बहुतांश विरोधक त्यांनी शिंदे गटात आणले आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency):

किरण सामंत यांचे मतदारसंघात एखाद्या लोकप्रतिनिधीप्रमाणे फारशी विकासकामे नाहीत. पंरतु लोकांचे प्रश्न सोडवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसाह्य करणे, मतदारसंघात रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आदी कार्यक्रम घेतात. किरण सामंत यांनी मतदारसंघात आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्यांच्या माध्यमातून ते जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. सामंत हे रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्या विविध कंपन्यांत त्यांनी स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. कोकणात जास्तीत राज रोजगार उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election):

निवडणूक लढवली नाही

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election):

निवडणूक लढवली नाही

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency):

किरण सामंत यांचा मतदारसंघातील जनसंपर्क अत्यंत प्रभावी आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून कोकणात त्यांनी छाप पाडली आहे. त्यातच उदय सामंत यांच्यासाठी राजकारणात पडद्यामागचे सूत्रधार म्हणून किरण सामंत कार्यरत आहेत. मतदारसंघात त्यांचा उद्योजक राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, यासह मतदारांशी चांगला संपर्क आहे. ते सामाजिक कार्यात सहभागी असतात. सण, उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह सोहळे, उद्घाटन यासाठी ते नेहमीच हजेरी लावताना दिसून येतात. उदय सामंतांच्या गैरहजेरीत मतदारसंघात जनतेत मिसळून काम करणे, मतदारसंघातील प्रश्न सोडवणे यासह कार्यकर्ते जोडण्याचे काम तेच करत असल्याने त्यांचा जनसंपर्काच्या कक्षा अधिकच रुंदावल्या आहेत. एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून रत्नागिरीतील तरुणाईमध्ये त्यांची क्रेझ आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles):

किरण सामंत हे सोशल मीडियावर फारसे सक्रिय दिसून येत नाहीत. मात्र त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून त्यांनी राजकारणात अनेकदा खळबळ उडवून दिली आहे. किरण सामंत यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली होती. व्हॉट्सॲप स्टेटसवर थेट उद्धव ठाकरे गटाचे मशाल हे चिन्ह ठेवले होते.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate):

आता मजा बघा... Landing Shortly...’ मी किरण रवींद्र सामंत.. रोखणार कोण? अशी विधाने त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून केली होती. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्गाच्या राजकारणात किरण सामंत चर्चेचा विषय ठरले होते. उदय सामंत हे आज मंत्री आहे, उद्या नसतील. कोणी ताम्रपट घेऊन आलेल नाहीत, असे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात होते. या वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्याशी त्यांचे वितुष्ट निर्माण झाले आहे का? अशी चर्चाही रंगू लागली आहे. कारण, यापूर्वीही किरण सामंत यांनी उदय सामंत शिंदे गटात असताना स्वत:च्या व्हॉट्सॲप स्टेटसला ठाकरे गटाचे मशाल चिन्ह ठेवले होते. त्यावेळी किरण सामंत अधिक चर्चेत आले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru):

शरद पवार, उदय सामंत

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate):

किरण सामंत हे कोकणातील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. उद्योजक म्हणून काम करताना त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतल्याने मतदारसंघावर त्यांची चांगली पकड निर्माण झाली आहे. विरोधकांना आपल्याकडे वळवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. राजकारणात पडद्यमागील सूत्रे हलवण्यात ते तरबेज मानले जातात, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते. याशिवाय शिवसेना फुटीनंतर त्यांनी ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सहभागी करून घेण्यात किरण सामंतांचा मोठा हात आहे. त्यामुळे शिंदे गटात लोकसभेसाठी किरण सामंत यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नसल्याचे मानले जात आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate):

किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांचा प्रत्यक्ष राजकारणात सहभाग नाही. त्यातच रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीचे उमेदवार एकत्र मिळून लढवणार आहेत. सध्या भाजपकडूनही या मतदारसंघातून उमेदार देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला सुटणार, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याशिवाय भाजपकडून राणे कुटुंबाकडून किरण सामंत यांना उमेदवारी देण्यास विरोध असल्याची चर्चा आहे. राणे कुटुंबासह प्रमोद जठार ही जागा शिंदे गटाला सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे किरण सामंत यांचा पत्ता कट होऊ शकतो. याशिवाय किरण सामंत यांची भूमिका तळ्यात-मळ्यात अशी आहे. त्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून ठाकरे गटाचे चिन्ह ठेवणे, किंवा.. कोण रोखणार अशा प्रकारची विधाने केल्याने त्यांच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे. या बाबी त्यांच्या उमेदवारीच्या मार्गात अडथळा ठरू शकतात.

Kiran Samant
Vasant More : "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की...", वसंत मोरेंचा स्टेटसमधून सूचक इशारा

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences):

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडून इच्छुकांची संख्या वाढतच आहे. शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत यांचे नाव आघाडीवर असले तरी ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजपकडून प्रमोद जठार, निलेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत भाजप हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवण्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यामुळे समजा जागावाटपात हा मतदारसंघ भाजपला मिळाला तर किरण सामंत यांचा पत्ता कट होणार आहे. आपला पत्ता कट झाल्यास उमेदवारी कोणाला मिळणार यावर किरण सामंत आपली भूमिका स्पष्ट करतील.

जर रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असेल तर आपण त्यांचा प्रचार करू, चव्हाण हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. परंतु राणे कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत किरण सामंताची नकारघंटा दिसून येते. त्यातच यापूर्वी नितेश राणे यांनी किरण सामंत हे निवडणूक लढवणार असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, त्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे मत व्यक्त केले होते. नारायण राणे यांनीही मतदारसंघात कोणीही पोस्टरबाजी करू नये, असा टोला किरण सामंतांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून लगावला होता.

त्यातच किरण सामंत यांनी यापूर्वी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून अनेकदा सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे किरण सामंत यांच्या मनात नेमके काय चालले आहे, ऐनवेळी ते कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सद्यस्थितीत मतदारसंघात शिवेसेनेच्या शिंदे गटाची ताकद जास्त आहे. त्याचा फायदा शिंदे गट आणि सामंत बंधू सोडणार नाहीत, हे निश्चित आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Kiran Samant
NCP Crisis : 'सध्या राजकीय संकट, पण तुम्ही पाठीशी राहा'; जयंत पाटलांची भावनिक साद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com