'सरकार जाती-जातींत भांडणं लावतंय' : शिंदे यांच्या शिवसेनेशी युती केलेला पक्षाचा महायुतीवर गंभीर आरोप अन् आंदोलनाचा थेट इशाराही
आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर जातींमध्ये भांडणं लावल्याचा गंभीर आरोप केला.
त्यांनी अनुसूचित जातीतील वर्गीकरणाला कडाडून विरोध करत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
देशात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी ठामपणे मांडली.
Sindhudurg News : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी, महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवताना, राज्य सरकार वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम करतयं, असा आरोप केला आहे. तसेच त्यांनी, अनुसूचित जातीमध्ये सरकारने वर्गीकरण करू नये, हीच आपली भूमिका आहे. सरकारच्या या भूमिकेला आपला विरोध आहे. पण जर विरोधाला झुगारून सरकारने पाऊल उचलले तर राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इशारा देखील दिला आहे. यामुळे राज्यातील महायुतीला शिंदेंच्या पक्षाशी युती केलेल्या पक्षाने आवाहन दिल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, अशोक कणगोलकर, प्रकाश करुळकर, मिलिंद जाधव, विनोद काळे, सुरेश मंचेकर, प्रदीप कांबळे, रमेश बावडेकर, अनिल तांबे, गोपाळ जाधव, विकास गायकवाड, बाळकृष्ण जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी आंबेडकर म्हणाले, ‘‘आपल्या समाजाने चळवळ उभी करण्यासाठी प्रचंड त्याग केला आहे. त्या समाजाला सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेशी युतीचा निर्णय आम्ही स्वीकारला. पण आता मातंग समाजही अनुसूचित जातीच्या आरक्षणात वेगळे आरक्षण मागत आहे.
राज्य सरकार वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करू नये, हीच आपली भूमिका आहे. सरकारच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येतील. देशामध्ये जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे, हे निश्चित ठरवता येणार नाही. यासाठी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी आम्ही करत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तसेच सध्याचे देशातील राजकारण पाहता कोणत्याही एकट्या पक्षाला निवडणुक लढवून जिंकणे सोपे राहिले नाही. त्यामुळे सगळीकडेच युती-आघाड्यांचे राजकारण दिसत आहे. अन्याय, अत्याचार याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली असली तरी या सत्तेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता कुठे दिसत नाही. सध्याच्या राजकारणात सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी युतीला पर्याय नाही. त्यामुळे सन्मान आणि सत्तेचा राजमार्ग दाखविणारी युती आम्ही शिंदे शिवसेनेसोबत केली आहे. त्यामुळे आपापसात लढत राहुन आपली ताकद वाया घालविण्यापेक्षा युतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी व्हा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
FAQs :
प्र.१: आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर कोणता आरोप केला?
उ: सरकार जातींमध्ये भांडणं लावते असा त्यांचा आरोप आहे.
प्र.२: त्यांनी अनुसूचित जातींबाबत काय भूमिका घेतली?
उ: अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण होऊ नये ही त्यांची भूमिका आहे.
प्र.३: रिपब्लिकन सेनेची पुढील भूमिका काय आहे?
उ: सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जातील.
प्र.४: आंबेडकरांनी कोणती मोठी मागणी केली आहे?
उ: देशात जातनिहाय जनगणना करण्याची ठाम मागणी केली आहे.
प्र.५: जातनिहाय जनगणना का आवश्यक आहे असं आंबेडकर म्हणतात?
उ: कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे ठरवण्यासाठी जनगणना आवश्यक असल्याचं ते म्हणतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.