
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणात मोठे बदल झाले आहेत.
भाजपला धक्का बसला असून ठाकरे गटालाही अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत.
आगामी निवडणुकीत दिग्गज नेते पुन्हा रिंगणात उतरतील अशी चिन्हे आहेत.
sindhudurg : विनोद दळवी
नुकताच जिल्हा परिषदेच्या सभापतींसह पंचायत समित्यांच्या अध्यक्षांचे आरक्षणाची घोषणा झाली. यामुळे आरक्षणाने काही इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. तर अनेकांना दिलासा मिळाला आहे. तर काही जणांची संधी हुकली असली तरी पर्यायी संधी निर्माण झाली आहे. जाहीर झालेल्या आरक्षणावरून जिल्ह्याच्या कानोसा घेतल्यास भाजपलाच सर्वधिक फटका बसला असून शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुखांनाही दणका बसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे एकाच वेळी भाजपसह-शिवसेनेची झोप उडाली आहे.
जाहीर झालेल्या आरक्षणानंतर आता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश सावंत, रेश्मा सावंत, समिधा नाईक, माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी सभापती संतोष साटविलकर, अनिशा दळवी यांना आरक्षणाने तारल्याचे दिसत आहे. पण माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी सभापती माधुरी बांदेकर, बाळा जठार, महेंद्र चव्हाण, जेरोन फर्नांडिस, अंकुश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. तसेच माजी अध्यक्ष संजना सावंत, रणजित देसाई यांना पर्यायी संधी उपलब्ध झाली आहे.
भाजप तालुकाध्यक्षाची संधी हुकली
वैभववाडी तालुक्यातील कोळपे मतदारसंघ सर्वसाधारण राहिला आहे. मागच्यावेळी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. येथून शारदा कांबळे निवडून येऊन समाजकल्याण सभापती झाल्या होत्या; परंतु आता हा मतदारसंघ सर्वसाधारण राहिल्याने येथे इच्छुकांची संख्या मोठी असेल. कोकिसरे सर्वसाधारण महिला यासाठी राखीव राहिल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांची संधी हुकली आहे. तर लोरे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव राहिल्याने पल्लवी झिमाळ यांना पुन्हा संधी मिळू शकते.
शिंदेंच्या शिवसेना उपनेत्याला पुन्हा संधी
कणकवली तालुक्यातील खारेपाटण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव राहिल्याने माजी बांधकाम सभापती बाळा जठार यांची संधी हुकली आहे. कासार्डे सर्वसाधारण राहिल्याने संजय देसाई यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. जानवली अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव झाल्याने श्रिया सावंत यांची संधी गेली आहे. फोंडा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झाल्याने शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे.
हरकूळ बुद्रुक सर्वसाधारण राहिल्याने माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना एका टर्मनंतर पुन्हा हक्काचा मतदारसंघ मिळाला आहे. कलमठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव झाल्याने स्वरूपा विखाळे यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. कळसुली सर्वसाधारण महिला माजी महिला व बालकल्याण सभापती सायली सावंत यांना संधी प्राप्त झाली आहे. नाटळ सर्वसाधारण राहिल्याने माजी अध्यक्ष संजना सावंत यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. तसेच महिला आरक्षणाने मागच्यावेळी संधी हुकलेल्या माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे.
देवगड तालुक्यातील पुरळ सर्वसाधारण राहिल्याने वर्षा पवार यांना संधी आहे. मात्र, पडेलमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण राहिल्याने गणेश राणे यांची संधी हुकली आहे. बापर्डे सर्वसाधारण महिला राहिल्याने अनघा राणे यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. पोंभुर्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राहिल्याने प्रदीप नारकर यांची संधी गेली आहे. शिरगाव अनुसूचित जाती राहिल्याने मानसी जाधव यांना पुन्हा संधी आहे. किंजवडे सर्वसाधारण महिला राहिल्याने मनस्वी घारे यांची संधी कायम राहिली आहे. कुणकेश्वर नागरिकांचा मागास प्रवर्ग सावी लोके यांची संधी हुकली आहे.
माजी सभापतींची संधी हुकली
मालवण तालुक्यातील आडवली-मालडी सर्वसाधारण महिला राहिल्याने माजी सभापती महेंद्र चव्हाण, आचरा सर्वसाधारण महिला राहिल्याने माजी सभापती जेरॉन फर्नांडिस यांची संधी गेली आहे. मसुरे मर्डे सर्वसाधारण महिला राहिल्याने माजी अध्यक्ष सरोज परब यांना पुन्हा संधी राहिली आहे. सुकळवाड अनुसूचित जाती महिला राखीव राहिल्याने माधुरी बांदेकर यांची संधी गेली आहे. पेंडूर सर्वसाधारण माजी सभापती संतोष साटविलकर यांची संधी कायम राहिली आहे. वायरी भूतनाथ सर्वसाधारण महिला राहिल्याने उबाठा मालवण तालुकाप्रमुख हरिश्चंद्र खोबरेकर यांची संधी गेली आहे.
माजी उपाध्यक्षांना मतदारसंघ शोधण्याची वेळ
कुडाळ तालुक्यातील आंब्रड सर्वसाधारण महिला राहिल्याने लॉरेन्स मान्येकर यांची संधी गेली आहे. वेताळ बांबर्डे सर्वसाधारण नागेंद्र परब यांची संधी कायम आहे. ओरोस बुद्रुक सर्वसाधारण महिला राहिल्याने माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यावर दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे. पावशी सर्वसाधारण राहिल्याने अमरसेन सावंत यांची संधी कायम राहिली आहे.
नेरूर देऊळवाडा नागरिकांचा मागास प्रवर्ग राहिल्याने माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनाही दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तेंडोली सर्वसाधारण महिला राहिल्याने वर्षा कुडाळकर यांची संधी कायम राहिली आहे. पिंगुळी सर्वसाधारण राहिल्याने संजय पडते यांची दावेदारी राहिली आहे. घावनळे नागरिकांचा मागास प्रवर्ग अनुप्रीती खोचरे यांची संधी कायम राहिली आहे. माणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग राहिल्याने राजेश कविटकर यांची संधी कायम राहिली आहे.
माजी अध्यक्षांना संधी
वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण सर्वसाधारण राहिला आहे. येथे मृत सुनील म्हापणकर नेतृत्व करीत होते. आडेली सर्वसाधारण राहिल्याने माजी अध्यक्ष समिधा नाईक यांना थेट नसली तरी संधी उपलब्ध आहे. तुळस सर्वसाधारण महिला राहिल्याने नितीन नाईक यांनाही संधी आहे. उभादांडा सर्वसाधारण राहिल्याने दादा कुबल यांनाही संधी आहे. रेडी सर्वसाधारण माजी सभापती प्रीतेश राऊळ यांची संधी कायम राहिली आहे.
शिवसेनेची डोकेदुखी वाढणार
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला माजी सभापती पल्लवी राऊळ यांची संधी हुकली आहे. आंबोली सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने रोहिणी गावडे यांची संधी कायम राहिली आहे. कोलगाव सर्वसाधारण राहिल्याने ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांची संधी कायम आहे. तळवडे सर्वसाधारण राहिल्याने उत्तम पांढरे यांनाही संधी आहे. माजगाव सर्वसाधारण माजी अध्यक्षा रेश्मा सावंत यांची संधी टिकली आहे.
इन्सुली सर्वसाधारण राहिल्याने उन्नती धुरी यांचीही संधी कायम आहे. मळेवाड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राहिल्याने राजन मुळीक यांची संधी गेली आहे. आरोंदा सर्वसाधारण माजी सभापती शर्वाणी गांवकर यांची संधी राहिली आहे. बांदा सर्वसाधारण राहिल्याने भाजप महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांची संधी कायम राहिली आहे. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राहिल्याने संपदा देसाई यांची संधी हुकली आहे. साटेली-भेडशी सर्वसाधारण महिला राहिल्याने माजी सभापती डॉ, अनीशा दळवी यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. माटणे सर्वसाधारण राहिल्याने माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची संधी कायम राहिली आहे.
सावंतवाडी, वेंगुर्लेत सर्वसाधारणचे वर्चस्व
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण राहिले आहे. त्यामुळे सर्वसाधारण मतदारसंघ महत्त्वाचे मानले जात आहेत. यात सावंतवाडी तालुक्यात 9 पैकी 6, वेंगुर्ले तालुक्यात पाच पैकी चार, कुडाळ आणि कणकवली तालुक्यात प्रत्येकी तीन, तर मालवण, वैभववाडी, देवगड आणि दोडामार्ग तालुक्यांत प्रत्येकी एक मतदारसंघ सर्वसाधारण राहिला आहे.
मालवण तालुक्यात महिला राज
आरक्षण सोडतीत मालवण तालुक्यात महिलाराज आहे. सहापैकी तब्बल पाच मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यातील प्रत्येकी 3 पैकी 2 मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहेत. देवगड सात पैकी चार, कणकवली आठ पैकी चार, सावंतवाडीत 9 पैकी 3, वेंगुर्ले 5 पैकी एक अशा प्रकारे तालुकानिहाय महिला आरक्षण राहिले आहे.
1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर कधी झाले?
➡️ नुकतेच महाराष्ट्र सरकारने आरक्षणाचा आराखडा जाहीर केला आहे.
2. या आरक्षणाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला?
➡️ भाजप आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांना फटका बसल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात.
3. या बदलामुळे स्थानिक नेत्यांमध्ये काय हालचाल सुरू आहे?
➡️ दिग्गज नेते पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
4. ठाकरे गटाचे पुढील पाऊल काय असू शकते?
➡️ स्थानिक पातळीवर नव्या युतींचा विचार आणि रणनीती आखली जात आहे.
5. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक केव्हा अपेक्षित आहे?
➡️ निवडणुका येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.