

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपमधून बंडखोरी करत निवडून आलेल्या सहा अपक्ष आणि ठाकरे गटाच्या तीन सदस्यांनी ‘विकास आघाडी’ स्थापन केली.
नऊ सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करत त्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.
इन्सुली येथील अपक्ष सदस्य नितीन राऊळ यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असून महायुतीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
Sindhudurg News : जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या भाजप आणि शिवसेना महायुतीच्या सत्ताधाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी भाजपमधून बंडखोरी करत निवडून आलेले सहा अपक्ष आणि ठाकरे शिवसेनेच्या तीन अशा एकूण नऊ सदस्यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी’ या नावाने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्याचे पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. इन्सुलीमधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नितीन राऊळ यांची गटनेते म्हणून निवड केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी महायुती म्हणून लढून भाजप २७ आणि शिवसेना १४ असे एकूण ४१ सदस्य निवडून आले होते. ठाकरे शिवसेनेचे केवळ तीन सदस्य निवडून आले; मात्र, अपक्ष म्हणून तब्बल सहा सदस्य निवडून आले. हे सहाही भाजपचे बंडखोर आहेत. यातील कणकवली, वेंगुर्ले व कुडाळ प्रत्येकी एक आणि सावंतवाडी तालुक्यातून तीन सदस्यांचा समावेश आहे.
आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडी होणार आहेत. त्यापूर्वी सहा अपक्ष आणि तीन ठाकरे शिवसेना अशा एकूण नऊ जणांनी जिल्हा परिषदेत स्वतंत्र गट स्थापन करीत वेगळीच राजकीय खेळी केली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांना धक्का देणारा हा निर्णय आहे. कारण बंडखोरी केली म्हणून भाजपने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले असले तरी विजयी झाल्यानंतर या सहाही बंडखोरांना भाजप आपले दरवाजे उघडून सन्मानाने पुन्हा पक्षात घेईल, असे वाटत होते.
अगदी तत्काळ निलंबन मागे घेतले नाहीतरी एक-दोन वर्षांत परतीचे वारे सुरू होतील, असे अपेक्षित होते; परंतु या सहाही जणांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी गटात सहभागी होत स्वतंत्र मार्ग निवडला आहे. त्यामुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप बंडखोर म्हणून निवडून आलेले इन्सुली येथील नितीन राऊळ, फोंडाघाट येथील राजन चिके, नेरुर देऊळवाडा येथील रूपेश पावसकर, माडखोल येथील शिवानी नाईक, कोलगाव येथील मायकल डिसोझा, तुळस येथील सुजाता पडवळ या अपक्षांसह ठाकरे शिवसेनेचे पिंगुळी येथील गंगाराम सडवेलकर, उभादांडा येथील संजय गावडे आणि तुळस येथील विजय नाईक यांचा या स्वतंत्र गटात समावेश आहे.
अदृश्य शक्तीची पुन्हा एकदा चर्चा
भाजपमधून बंडखोरी करीत निवडून आलेल्या सहा जणांनी चक्क ठाकरे शिवसेनेच्या तीन सदस्यांसोबत गट स्थापन केला आहे. यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत. एकवेळ अपक्ष सहा जणांनी स्वतंत्र गट स्थापन केला असता तर समजू शकले असते; परंतु ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांना घेऊन विरोधी गट स्थापन केला आहे. त्यामुळे यामागे अदृश्य शक्ती नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
सत्ताधाऱ्यांवर दबावगट स्थापन करण्यासाठी ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी' नावाने गट स्थापन केला आहे. विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडताना विकासकामांना पाठिंबा देऊ; पण चुकीचे काम होऊ देणार नाही.
- राजन चिके, अपक्ष, फोंडाघाट
जनतेने न्याय देत आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत. त्यासाठी आम्ही विरोधक म्हणून योग्य भूमिका बजावणार आहोत. पाच वर्षे सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम राहील. आम्ही विरोधी गट स्थापन केला आहे; परंतु ठाकरे शिवसेनेचे आम्ही तीन सदस्य निवडून आलो असलो तरी सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास आम्ही पुरेसे आहोत. ठाकरे शिवसेना आणि आम्ही स्थापन केलेला विरोधी गट या माध्यमातून प्रबळ दबाव दाखवून देऊ.
- संजय गावडे, ठाकरे शिवसेना
1. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत किती सदस्यांनी नवा गट स्थापन केला?
एकूण नऊ सदस्यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी’ स्थापन केली.
2. या गटात कोणते सदस्य आहेत?
भाजपमधून बंडखोरी करून निवडून आलेले सहा अपक्ष आणि ठाकरे शिवसेनेचे तीन सदस्य आहेत.
3. गटनेते म्हणून कोणाची निवड झाली?
इन्सुलीमधील अपक्ष सदस्य नितीन राऊळ यांची गटनेतेपदी निवड झाली.
4. या आघाडीचे उद्दिष्ट काय आहे?
जिल्हा परिषदेत महायुती सत्ताधाऱ्यांवर दबाव ठेवणे आणि स्वतंत्र भूमिका मांडणे हे उद्दिष्ट आहे.
5. पुढील राजकीय परिणाम काय असू शकतात?
जिल्हा परिषदेत सत्तासमीकरण बदलण्याची आणि नव्या राजकीय चर्चांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.