

Ratnagiri News : रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर महायुतीचे नेते एकत्र एकाच गाडीतून गेले असतानाच गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यात दुरावा समोर आला होता. यानंतर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा जोरदार रंगली होती. या घटनेला काहीच दिवस झाले असतानाच तटकरेंनी थेट योगेश कदमांच्या बालेकिल्ल्यातच राजकीय उडी घेतली आहे.
त्यांनी दापोलीवर दावा ठोकत, येथे पक्षाचे आमदार निवडून आले होते. आता हे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात तटकरे-कदम वाद रंगण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर तटकरे बाहेर पडताच कदमांनी त्यांची भेट टाळली. तसेच तटकरे यांच्याकडे पाठ फिरवत निघून गेले. या राजकीय घडामोडीकडे दापोली विधानसभा मतदारसंघातील दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. तशा चर्चादेखील जिल्ह्यात झाल्या.
दरम्यान, दापोली शहरातील फाटक कॅपिटल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा तटकरेंच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी बाबाजी जाधव, दौलतराव पोस्टुरे, अजय बिरवटकर, साधना बोत्रे, जयवंत जालगांवकर, संदीप राजपुरे, रमा बेलोसे, विनिता शिगवण, नितीन मयेकर आदी उपस्थित होते.
याच पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, सुभाष पवार, कुतुबुद्दीन बर्डे, रऊफ काझी, प्रदीप गमरे यांच्यासह आसूद बौद्धवाडी, कडूवाडी, गुरववाडी, हर्णै तसेच तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तर माजी तालुकाध्यक्ष मंगेश मोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला धक्का लागल्याचे बोलले जात आहे.
तटकरे यांनी, ‘रत्नागिरी जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा होता. चिपळूण, रत्नागिरी, दापोली आणि गुहागरमध्ये पक्षाचे आमदार निवडून आले होते. आता हे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कामाला लागावे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी यापुढे दर आठवड्याला पक्षप्रवेश सोहळा झाला पाहिजे,’ असे आवाहन केले.
खासदार तटकरे म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष अशी असून, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. यापुढेही त्याच विचाराने वाटचाल करणार असल्याची भूमिका आमची आहे. भाजपप्रणित एनडीए आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतानादेखील अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यांच्यासमोरही आमची ही भूमिका स्पष्ट केली होती. ज्याला त्यांनी होकार दिल्यानंतरच आम्ही आघाडीत सहभागी झालो.’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.