

Nitesh Rane News : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर धडक कारवाई केली जात आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, भाजप नेते तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची राज्यभर चर्चा होत आहे. त्यांनी थेट तुकाराम मुंढे यांनाच सल्ला दिला असून, नेमक्या धाडी कोणत्या ठिकाणी टाकायच्या याचा सल्ला दिला आहे. तसेच विविध ठिकाणी भयंकर प्रकारदेखील सुरू असल्याची तक्रार मुंढे यांच्याकडे केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांनी विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईमुळे राज्यात भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, अनेक व्यापाऱ्यांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे एकीकडे राज्यभर त्यांच्या कारवाईचे कौतुक केले जात आहे.
दुसरीकडे, तुकाराम मुंढे यांना मंत्री नितेश राणे यांनी फोन केल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनीच माहिती दिली असून, मुंढेंना सल्ला दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर हाजी अली ज्यूस सेंटरवर धाड टाकावी, असा सल्ला दिल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या मागणीनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची आता शक्यता आहे.
नवी मुंबईत वराह जयंतीच्या दिवशी उलवे येथील एका कार्यक्रमात मंत्री नितेश राणे म्हणाले, येथे इतके चांगले मोदक आहेत की, तुकाराम मुंढे इथे फिरूही शकत नाहीत. पण त्यांनी जरा हाजी अली ज्यूस सेंटरवर धाड टाकावी. बडे मियाँ वगैरेच्या स्टॉल्सवर धाडी टाकाव्यात. ते फालुदामध्ये रंग मिसळून आमच्या पोटात विष टाकण्याचे काम करत आहेत, असा आरोपदेखील यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.
याचवेळी नितेश राणे यांनी, समोरचा व्यक्ती हिंदूच असावा, त्याला हनुमान चालीसा आली पाहिजे, अशाच व्यक्तीकडून वस्तू विकत घेईन, अशी भूमिका प्रत्येक हिंदूने घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
तसेच, यावेळी नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मदरसा आणि मशिदींना टार्गेट केले असून, येथे हनुमान चालीसा शिकवत नाही, तर फक्त आतंकवाद शिकवतात, असा दावा केला आहे. तर त्यांच्या कोणत्याही सणांत हिंदूला परवानगी दिली जात नाही. दुकान लावायला दिले जात नाही. आणि चुकून जर हिंदू दिसला, तर ते फतवे काढतात, असाही आरोप त्यांनी केला आहे.
उलव्यात लकी मराठा नावाने मुस्लिम लोकांनी चार दुकाने उघडलेली आहेत. पण त्यांचा कसा कार्यक्रम करायचा, तो करू, असा इशारादेखील नितेश राणे यांनी देताना आपले हिंदू राष्ट्रच आहे, असे म्हटले आहे. तर आपण पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना, हाजी अली ज्यूस सेंटरमध्ये एकदा घुसा, जे विष टाकतात ते बघा, असे सांगणार असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.