
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटातील कुरघोडीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
वैभव नाईक यांनी भाजपवर आरोप केला की, पैशांच्या आमिषावर पक्ष वाढविला पण आता त्याच कारणाने कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत.
"भाजपने जे पेरलं, तेच उगवतंय," असे म्हणत त्यांनी भाजपच्या रणनीतीवर रोखठोक टीका केली आहे.
Sindhudurg News : तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सध्या महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही अलबेल नसल्याचे समोर येत आहे. दोन्ही पक्ष आपल्या पक्षाची ताकद वाढण्यासाठी एकमेकांचे पदाधिकारी आणि नेते पळवताना दिसत आहे. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीत मिठाचा खडा पडला असून शिवसेनेनं जर त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम थांबवला नाही तर भाजप दुप्पट वेगाने शिवसेना फोडेल असाच इशाराच भाजपकडून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिला आहे. तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू परब आणि इतर पदाधिकार्यांविरोधात तक्रार देखील केली आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तंग झाले आहे. अशातच भाजपने पैशांच्या आमिषांद्वारे कार्यकर्ते मिळवून पक्ष वाढविला. मात्र आता तेच कार्यकर्ते अधिक आमिषे मिळताच दुसऱ्या पक्षात जात आहेत. भाजपने जे पेरलं तेच आता उरवतं असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. (Why BJP leaders and workers are switching to Shinde Sena in Sindhudurg Maharashtra)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध वैयक्तिक प्रलोभने तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासने देवून चुकीच्या पद्धतीने शिवसेनेत (शिंदे) नेले जात आहे. त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला जात आहे, अशी तक्रार भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. तर त्यांनी याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू परब आणि इतर पदाधिकार्यांचे आपल्या पत्रात नाव घेतलं होते. यामुळे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तसेच आगामी स्थानिकच्या तोंडावर या दोन्ही पक्षांमध्ये भविष्यात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यादरम्यान माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी नाईक म्हणाले की, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्ह्यात सुरू असलेले राजकारण सांगितले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आमिषे देऊन पक्षप्रवेश घडवून आणत आहेत, असा दावा केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे.
सध्या जे जिल्ह्यात राजकारण सुरू आहे ते जुने जानते कार्यकर्ते अप्पासाहेब गोगटे, सदा ओगले, अभय सावंत, अतुल काळसेकर, हडकर यांना पटलेले नाही. या कार्यकर्त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. पण ग्रामपंचायत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने फक्त पैशांचा वापर करून कार्यकर्त्यांना आकर्षित केले. यामुळे पक्षाला ‘वाढ’ झाल्याचा भास झाला. मात्र, ती केवळ ‘सूज’ होती हे आता स्पष्ट झाले आहे.
तर जिल्ह्याचे भाजपचे नेतृत्व प्रभाकर सावंत अथवा रवींद्र चव्हाण यांच्याकडे नसून ते राणे कुटुंबाकडे आहे. हेच आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात भाजपचे खासदार, राज्यात मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान भाजपचे असतानाही कार्यकर्ते आमिषांना भुलून पक्ष बदलत आहेत. यामुळे प्रभाकर सावंत यांच्या हतबलतेचे चित्र स्पष्ट झाले आहे. रवींद्र चव्हाण यांनी भाजप पक्ष वाढवला. मात्र, एका वर्षात तो चोरला जात असल्याचे सिंधुदुर्गवासीय पाहत आहेत, असाही टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.
...तर सावंतांसारखे मोजके कार्यकर्ते
नाईक यांनी प्रभाकर सावंत यांना सल्ला देताना म्हटले आहे, ‘‘अजूनही वेळ गेलेली नाही. रसद पुरविण्याचे बंद करा, मतदारांची आणि जनतेची कामे करा आणि विचारांद्वारे कार्यकर्ते घडवा. उद्या सत्ता बदलली तर राणे कुटुंब ज्या पक्षात जाईल, त्या पक्षात त्यांचे कार्यकर्ते जातील आणि सावंत यांच्यासारखे मोजके कार्यकर्तेच भाजपमध्ये राहतील.’’
1. सिंधुदुर्गात नेमका काय वाद सुरू आहे?
सिंधुदुर्गात भाजप आणि शिंदे गटात कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीवरून संघर्ष वाढत आहे.
2. वैभव नाईक यांनी नेमकं काय म्हटलं?
त्यांनी भाजपवर टीका करत म्हटलं की, पैशांच्या आमिषावर कार्यकर्ते घेतले आणि आता अधिक आमिष मिळालं की तेच कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहेत.
3. यामुळे कोणत्या पक्षाला फटका बसणार आहे?
भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.