

बच्चू कडूंनी जळगावनंतर पुढील आंदोलन हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आंदोलन करण्यासाठी दुसऱ्यांना नाही, तू स्वतः पाळधीला येऊन दाखव, मी दाखवतोच", असं आव्हान त्यांनी कडूंना दिलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं महाराष्ट्रातील तीन मोठ्या बॅँकावर कारवाई केली आहे. यात द जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या तीन जिल्हा बँकांचा समावेश आहे. या बँकांना आर्थिक दंड करण्यात आला आहे.
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी राज्यात पेटलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा वादावर भाष्य केलं आहे. त्यांनी समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते. आपण भावंडांसारखे आणि एक समाज म्हणून राहतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा एकत्रितपणे आपण धावून जातो.त्याचमुळे गावकी आणि भावकी एकत्र होती ती अशीच एकत्र राहावी असं मत व्यक्त केलं.
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथमध्ये पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. मतदार याद्यांचा अभ्यास करा, मते चोरीला जातात म्हणून गाफील राहू नका, असा सल्ला देत त्यांनी अंबरनाथची नवी कार्यकारिणीही जाहीर केली.
आमचा ग्रामपंचायत सदस्यही चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही, यापुढे ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करायचं असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं. आष्टीचा जब्या म्हणत त्यांनी भाजप आमदार सुरेश धसांवरही टीका केली. आष्टीचा जब्या विधानसभेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडे परत येईल, त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करू असा इशाराही त्यांनी दिला. बीडमधील केज या ठिकाणी ओबीसी समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नवनाथ वाघमारे बोलत होते.
राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केली.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनात सर्व महिला पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची महत्वाची बैठक विभागीय अधिकाऱ्यांसमवेत छत्रपती संभाजीनगर येथील सिंचन भवन येथे घेतली. या बैठकीत मुख्यतः लाभक्षेत्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक चर्चा करून आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर अधिकच्या प्रयत्नांची गरज केल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले राज व उद्धव ठाकरे हे बंधू गेल्या दोन महिन्यात पाच वेळा एकत्र आले. त्यामुळे येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. त्यातच आता सोमवारी घटस्थापनेदिवशी शिवाजी पार्कमधील जिमखान्याचे भूमिपूजन करण्यासाठी पुन्हा राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे समजते. त्या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु आहे.
एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी बंजारा समाजाने केली असून त्यासाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. हिंगोलीत हजारोंच्या संख्येने बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बंजारा समाजाचे धर्मगुरू बापू सिंग महाराज देखील मोर्चात सहभागी झाले होते. सरकार बंजारा जमाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता वेब पोर्टल असणार आहे. योजनेत पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या मदतीने शासन ई केवायसी करणार आहे. महिन्याचं मानधन वेळेत मिळावं यासाठी लाडक्या बहिणींनी ई केवायसी करावे असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे.
हैद्राबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात आज बंजारा समाजाने भव्य एल्गार मोर्चा काढला आहे.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर बंजारा समाजही एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टिकेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करत 'सबुरी'चा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. या पुढे अशा टीका न करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा यापुढे पालन करणार असल्याचे आमदार पडखळकरांनी सांगितले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर AI च्या माध्यमातून टीका झाली, त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का? माफी मागायचा काय विषय येत नाही," असे आमदार पडळकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी हल्ला चढवला आहे. "संजय राऊत यांना राहुल गांधी यांचा डॉग असल्याचे म्हणत, त्यांनी ज्यांची औकात काढण्याचा विषय काढला ते कालपर्यंत शिवसेनेसोबत होते. संजय राऊत यांची औकात उध्दव ठाकरे यांनीच दाखवून दिली आहे. बाळासाहेब सामनाचे संपादक होते. त्यांच्यानंतर बाळासाहेब नसताना पत्रकारितेचा काही एक संबंध नसणारे उध्दव ठाकरे संपादक झाले. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा रश्मी ठाकरे संपादक झाल्या. या सर्व काळात संजय राऊत कायम कार्यकारी संपादक पदावरच राहिला," असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला आहे.
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर इथं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्यामुळे ओबीसी समाजाचा आरक्षण गेले म्हणून एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन केली आत्महत्या केली. भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी कुटुंबाला धीर देत, असे काही करू नका, असे आवाहन केले. निवृत्ती यादव या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलकीची आहे, हे पाहून खूप अवघडल्यासारखे वाटले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेवरून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. जतमध्ये मोर्चा काढला जात असताना, खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 'विचार करा... आपण केवळ एका पक्षाचे नाहीत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार? की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार? महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय! असे खासदार कोल्हे यांनी पत्रात लिहिले आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावरती वादग्रस्त टीका केली होती. यावर आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. वक्तव्य चुकीचा असून आम्ही त्याचा निषेध करतो. पडळकर यांना कोणाचा तरी, वरदस्त असल्यामुळे त्यांचा अहंकार वाढला आहे. भाजपने अशा नेत्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी आमदार पवारांनी केली.
सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरोध जयंत पाटील, असा संघर्ष निर्माण झाला आहे. गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ जतमध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चासाठी जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जतसाठी रवाना होत आहेत.
राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी पक्षाला पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हल्ले होणार,मात्र घाबरून मागे हटता येणार नाही, असं सूचक विधान भुजबळांनी केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज अंबरनाथ, कल्याणमध्ये दौरा आहे. अंबरनाथ , उल्हासनगर, बदलापूर या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीसाठी बैठक होत आहे. यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांचा हा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्या दौरा आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नागपुरात राष्ट्रवादीचं आज चिंतन शिबिर सुरु झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक पार्श्वभूमीवर पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांसह सर्व नेते,पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईतील एटीएम मशिन आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्षेत्रीय स्तरावरील समितीने छाननी केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून बोगस दाखल्यांच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र न देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, तरीही बोगस दाखल्यांच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याचं पडताळणी समितीच्या लक्षात आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडींची पाहणी करून सोमवारपर्यंत अहवाल द्या, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पथ विभागाला बैठकीत दिली आहेत. शहरातील 32 रस्ते आणि कोंडी होणाऱ्या 22 ठिकाणाची पाहणी करा, असं आयुक्तांनी सांगितलं आहे. पालिका आणि पोलिसांनी प्रयत्न करूनही वाहतूक कोंडी कमी होत नसल्याने आयुक्तांनी हे आदेश दिलेत तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय उपाययोजना करायची यावर निर्णय होणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसने आंदोलन करण्यात आलं आहे. परीक्षा शुल्कवाढी परिपत्रकाची होळी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे. विद्यापीठाने परीक्षा शुल्कामध्ये 20 टक्के वाढ केल्याने विद्यार्थी काँग्रेसने त्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने वसमत तालुक्यातील भेंडेगाव या गावांमध्ये दोन गटांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यामुळे भेंडेगावात तणाव निर्माण झाला होता. याची घटनेची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळताच त्यांनी भेंडेगावात जात शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर जरांगे यांचे समर्थक पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आणि त्यांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पुणे शहरातील स्वारगेट परिसरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. स्वारगेट (कै. केशवराव जेधे चौक) येथील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम आज (ता.19) रात्री 11:00 ते 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी दिली. तर वाहतुकीत बदल करत या दुरुस्ती कामाच्या काळात, स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांना भुयारी मार्ग सुरू होण्यापूर्वी डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जावे लागेल तेथून सारसबागकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आल्याचं सांगितलं आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. शिवाय येत्या दोन महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोवरून आता शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला होता. यावरून ठाकरेंच्या सेनेने आनंद दिघे नेते, उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाप्रमुख होते. त्यांचा फोटो तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावता? असा सवाल उपस्थित केला आहे. ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी शिंदेंचा हा कट आहे. तर यावर दिघेसाहेब खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.