
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत यंग ब्रिगेडला मैदानात उतरवले आहे. पक्षाकडून आतापर्यंत 72 उमेदवार जाहीर केले असून त्यापैकी 8 उमेदवार चाळिशीच्या आतले आहेत. पक्ष फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी तरुणाई साद घातली होती. त्याचेच प्रतिबिंब उमेदवारांमध्ये दिसत असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने चांगलीच मुसंडी मारली. सर्वाधिक स्ट्राईक रेट राखत पक्षाला आठ जागा मिळाल्या. मातब्बर नेते पक्ष सोडून गेलेले असताना त्यांनी तरुणाईला सोबत येण्याचे आवाहन केले होते. या निवडणुकीत तरुण मतदारांनी त्यांच्या पक्षाला साथ दिल्याचे चित्र त्यांना मिळालेल्या जागांवरून स्पष्ट होते.
आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानातही शरद पवारांनी तरुणाईच्या खांद्यावर बराचसा भार टाकला आहे. महाविकास आघाडीत पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या 72 उमेदवारांपैकी आठ उमेदवार 40 च्या आतले आहेत. सर्वात तरुण उमेदवार तासगांवचे रोहित पाटील हे आहेत. त्यांचे वय केवळ 25 वर्षे आहे. तर कारंजा मतदारसंघातील ज्ञायक पटणी आणि मोहोळ मतदारसंघातील सिध्दी कदम हे दोघेही 26 वर्षांचे आहेत. अकोले मतदारसंघात तिकीट देण्यात आलेले अमित भांगरेही तिशीच्या आतले त्यांचे वय 27 वर्षे आहे.
यंग ब्रिगेडमध्ये अणुशक्तीनगरमधून फहाद अहमद, बारामतीतून युगेंद्र पवार, आष्टीतून मेहबूब शेख आणि कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांचाही समावेश आहे. यामध्ये केवळ रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. आघाडीच्या फॉर्म्यूल्यानुसार पवारांच्या पक्षाला 85 जागा मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिध्द होईल. त्यामुळे किती तरुणांना उमेदवारी दिली जाईल, हेही पुढील काही तासांत स्पष्ट होईल.
- रोहित पाटील (तासगांव) – 25 वर्षे
- ज्ञायक पटणी (कारंजा) – 26 वर्षे
- सिध्दी कदम (मोहोळ) – 26 वर्षे
- अमित भांगरे (अकोले) – 27 वर्षे
- फहाद अहमद (अणुशक्तीनगर) – 32 वर्षे
- युगेंद्र पवार (बारामती) – 33 वर्षे
- मेहबूब शेख (आष्टी) – 38 वर्षे
- रोहित पवार (कर्जत जामखेड) – 39 वर्षे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.