
Mumbai : महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली असली तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार, कोणाकडे कोणते खाते असणार, याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस संभ्रम वाढतच चालला आहेत. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी त्यात आणखी भर घालत सगळ्यांनाच कोड्यात टाकले आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नसतील तर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे. त्याविषयी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी कोणतीही शक्यता फेटाळून लावलेली नाही. दरे गावातून ठाण्याकडे निघण्यापूर्वी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविषयी उत्सुकता वाढवली आहे. याबाबत चर्चा सुरू असून अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे उत्तर एकनाथ शिंदेंनी दिले.
महायुती सरकार स्थापनेबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, अजूनही चर्चा सुरू आहेत. पण अनेक लोकं वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. प्रामुख्याने पत्रकार अशा चर्चा करत आहेत. आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. मुंबई माझी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होईल. आपण सर्व गोष्टींवर चर्चा करू आणि नंतर अंतिम निर्णय घेऊ.
लोकांनी आम्हाला बहुमत दिले आहे, त्यामुळे आम्ही उत्तरदायी आहोत, असे शिंदेंनी सांगितले. महायुतीने विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 230 जागा मिळवत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या असून शिंदेंच्या शिवसेनेला ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे.
विविध मंत्रिपदांवरून महायुतीत रस्सीखेच असल्याचेही बोलले जात आहे. त्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या. आम्ही दिलेल्या आश्वासनांमुळे लोकांना आम्हाला निवडून दिले. त्यामुळे कोणाला कोणते पद मिळते, हे महत्वाचे नाही. लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आमचे काम आहे. चर्चेनंतर सर्व प्रश्न सुटतील, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना शिंदे यांनी पुन्हा एकदा मोदी आणि शाह यांना संपूर्ण अधिकार दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मोदी आणि शाह जो निर्णय घेतली, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल.’ दोघांना आपण फोन करून याबाबत माहिती दिल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.