

New Delhi News: गेल्यावर्षी ओल्या दुष्काळाचा तडाखा सहन केल्यानंतर यंदा राज्यावर कोरड्या दुष्काळाचं संकट ओढवलं आहे.त्यातही मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस कमी झाल्यानं दुष्काळाचा फटका सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत अनुक्रमे गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच राज्यातील भीषण दुष्काळाचं वास्तव दोन्ही नेत्यांसमोर मांडत मदतीसाठी साद घातली होती. त्यानंतर आता राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी दौऱ्यासाठी केंद्र सरकारचं पथक मुंबईमध्ये दाखल झालं आहे. प्रत्येकी 11 सदस्यांचे हे तीन पथकं असणार आहे.11 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा तीन विभागातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी या पथकांकडून केली जाणार आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महत्त्वाची बैठक गुरुवारी (ता.8 ऑक्टोबर) होत आहे. ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली. या 33 जणांच्या पथकांना संबंधित बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर,जालना आणि बीड जिल्ह्यासाठी एक पथक,अहिल्यानगर,सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी दुसरं आणि विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि नजीकच्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. या पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथक या दुष्काळाची भीषण तीव्रता दिल्ली दरबारी मांडणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.7 ऑक्टोबर) रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. तसेच केंद्राकडून विशेष मदतीची मागणी केली होती.
तत्पूर्वी,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रात उद्भवलेल्या भीषण दुष्काळ परिस्थितीवर या बैठकीत सुमारे एक तास चर्चा झाली। राज्य सरकारने 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये (सुमारे 74%) दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण मदत करण्याचे आणि लवकरच केंद्रीय पथक पाहणीसाठी पाठवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सांगितली होती. तसेच शेतकऱ्यांची दिवाळी उदास जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.