

Uttar Pradesh AAP Crisis : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला लागलेली गळती अद्याप थांबलेली नाही. आता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये मोठा झटका बसला आहे. येथे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष नीलिमा यादव यांनीच १२ वर्षांनंतर पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश आपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला आप पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या प्रियंका कक्कड यांनी पक्षाला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच कक्कड यांच्यासह रजत राकेश टंडन आणि माजी आमदार श्याम सुंदर शर्मा यांनीदेखील काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले होते.
नीलिमा यादव यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत काँग्रेसमध्ये गुरुवारी (ता. ८) प्रवेश केला. यावेळी त्यांनी, "लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्न करत असून, देशाला काँग्रेस आणि राहुल गांधी यांची गरज आहे," असे म्हटले.
"लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष लढा देत आहे," असेही त्यांनी सांगितले. आपण देखील उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीला १२ वर्षे दिली.
मात्र, पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यांपासून दूर गेले. यामुळे आता कुठेतरी कार्यकर्त्यांना आपली फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे. या कारणानेच काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे स्पष्टीकरण नीलिमा यादव यांनी दिले आहे. तसेच, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनीदेखील काँग्रेससोबत यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नीलिमा यादव कोण?
नीलिमा यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या असून, त्यांची २०१९ मध्ये महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पक्षात तब्बल १२ वर्षे दिली आहेत. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांच्यासह रजत राकेश टंडन आणि माजी आमदार श्याम सुंदर शर्मा यांनीदेखील आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशांमुळे आपला मोठे धक्के बसल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.