

Maharashtra drought relief : पावसाने राज्याच्या अनेक भागातून दडी मारल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पीके करपू लागली असून अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यातील दुष्काळी स्थितीची प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली असून त्याआधारे दुष्काळाबाबत पहिली अधिसूचना शनिवारपूर्वी काढणार येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आतापर्यंत आपल्याकडे जी माहिती आली आहे, त्याआधारे दुष्काळ कुठे आणि त्याच्या उपाययोजनांचा त्यात समावेश असेल. त्यातून एखादा भाग सुटला तर नंतर समाविष्ट करता येईल, असेही ते म्हणाले.
तात्काळ उद्यापासून पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मदत करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या मदतीसाठी यासाठी नियमानुसार प्रस्ताव तयार करण्यासाठी फिल्डवरची माहिती गोळा केली जाणार आहे. बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. पीकं करपली आहेत. विशेषत; काही भागात सोयाबीन, मका, कापूस यावर सर्वाधिक परिणाम दिसतो. भात, ज्वारीवरही परिणाम झालाय. त्याची आकडेवारी आमच्याकडे येतेय. त्याआधारे उपाययोजना करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा
राज्यात पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा या दोन गोष्टींवर सर्वाधिक भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुढचे सात-आठ महिने आपल्याला काढायचे आहेत. त्यादृष्टीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन याबाबत महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मंत्रिमंडळ उपसमिती
दुष्काळी स्थितीत अनेक निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी मंत्रिमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली आहे. दरआठवड्याला बैठक घेऊन ही समिती फिल्डवरील माहितीचा आढावा घेईल. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दर आठवड्यात समितीच्या अहवालाआधारे कार्यवाही करू. या उपसमितीला मंत्रिमंडळाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
केंद्राकडे आर्थिक मदत मागितली जाणार आहे. नियमानुसार प्रस्ताव तयार केले जाईल. मागील दुष्काळ किंवा अतिवृष्टीत केंद्राच्या मदतीची वाट कधीच बघितली नाही. ती मदत मिळते, पण विलंब होतो. आपला प्रस्ताव जाईल, पण त्यासाठी आम्ही थांबणार नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
कर्नाटकने दुष्काळ घोषित केला तरी महाराष्ट्र का करत नाही, असाल विरोधक उपस्थित करत आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटकने दुष्काळ जाहीर केलेला नाही. एनडीआरएफच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करून दुष्काळ जाहीर केला जातो. त्यांनी डेटा गोळा करत असल्याचे सांगितले आहे. नुसता दुष्काळ जाहीर करून चालत नाही. त्याबाबत उपाययोजना कराव्या लागतात. त्यानुसार शनिवारपूर्वी अधिसूचना काढू. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे कार्यवाही करू. मात्र, दरवेळी आपण उपाययोजना सुरू करणार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.