

राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे.
राज्यातील 24 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे 35 हजार कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे.
कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून ती 30 जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Mumbai News : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पी अधिवेशनात झाला असून थकबाकीदार शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यस्तरीय बैंकर्स कमिटीने अहवाल तयार केला आहे. यामुळे आता कर्जमाफीच्या निकषांनुसार पात्र सर्वच शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याबाबत सध्या संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरु असून ती राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ३० जूनपर्यंत होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल विरोधक करत असतानाच थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय अर्थसंकल्पी अधिवेशनात महायुती सरकारने घेतला. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत पीक कर्ज थकित असलेल्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले होते. पण ती कधीपर्यंत मिळणार याबाबत माहिती समोर आली नव्हती किंवा याबाबत अद्याप निर्णय झालेला नव्हता.
दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी कर्जमाफीसाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ही कर्जमाफी केवळ गरीबांनाच मिळायला हवी, त्यासाठी एसओपी तयार केली जात असल्याचे सांगत सरकारने त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतरच कर्जमाफीचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे म्हटले होते. यामुळे थकबाकीतील दोन लाखांचे पीककर्जच माफ होणार की मध्यम मुदतीच्या कर्जाचा देखील त्यात समावेश होणार याबाबत संभ्रम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
पण आता राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्यस्तरीय बैंकर्स कमिटीचा राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे थकबाकी आहे. त्यांच्याकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे. तर पीककर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश आहे.
सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँकांसह अन्य बँकांकडील सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. त्यात एक-दीड लाख रुपयांपर्यंतच पीककर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय बहुतेक शेतकऱ्यांचे पीककर्ज नियमित आहे. मात्र मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे. त्यामुळे दोन लाखांची कर्जमाफीच्या निकषांनुसार पात्र सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे. केवळ दोन लाखाचे थकीत पीककर्जच माफ होईल, असा निकष नसणार असल्याचेही माहिती सूत्रांनी 'सकाळ'ला सांगितले. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ होणार आहे.
दोन लाखांची माफी
राज्यातील २४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे बँकांचे ३६ हजार कोटीपर्यंत थकबाकी आहे. त्यात सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, जालना, बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व अहिल्यानगर या जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी आहे. त्यात पीककर्ज असो की शेतीवरील मध्यम मुदतीचे कर्ज, त्या थकबाकीतील दोन लाख माफ होतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
थकीत कर्जाची स्थिती
एकूण शेतकरी १,३३,४४,२०९
थकबाकीतील शेतकरी २४,७३,५६६
एकूण थकबाकी ३५,४७७ कोटी
शेतकऱ्यांकडील पीककर्जाची परतफेड करण्याची शेवटची मुदत ३० जूनपर्यंत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली दोन लाखांची कर्जमाफी मुदतीत मिळेल. त्यादृष्टीने सध्या संबंधित विभागाकडून कार्यवाही सुरु आहे.
-दत्तात्रेय भरणे, कृषी मंत्री
1. कर्जमाफी किती रकमेची आहे?
पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे.
2. किती शेतकरी या योजनेत येणार आहेत?
सुमारे 24 लाखांहून अधिक शेतकरी पात्र ठरू शकतात.
3. कर्जमाफी कधीपर्यंत मिळणार आहे?
30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
4. कोण पात्र ठरणार आहेत?
निकषांनुसार थकबाकीदार शेतकरी पात्र ठरणार आहेत.
5. हा निर्णय कोणी जाहीर केला?
कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.