Sugar Factory News: राज्यातील साखर कारखानदारीला घरघर; कारखान्यांची संख्या २०० वरून १०० वर, सरकारकडून 'या' मोठ्या निर्णयाची घोषणा

Maharashtra Government : मागील दोन वर्षांत राज्य सरकारच्या हमीवर एनसीडीसीमार्फत ३३ सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. मात्र इतकी मोठी मदत मिळूनही या कारखान्यांची आर्थिक गाडी अद्याप रुळावर आलेली नाही.
Sugar Factory
Sugar Factory Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी साखर कारखानदारीची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक झाली आहे. गेल्या २५ वर्षांत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या निम्म्याने घटली असून, स्वतःच्या बळावर चालणारे कारखाने तर बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत.

साखर कारखानदारीवरील हे संकट लक्षात घेता राज्य सरकार आता अॅक्शन मोडवर आले असून, कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांची एक विशेष समिती स्थापन केली आहे.

महाराष्ट्रात २००० सालापूर्वी २०० पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने मोठ्या दिमाखात सुरू होते. मात्र, गेल्या अडीच दशकांत आर्थिक अडचणी, अवसायन प्रक्रिया आणि व्यवस्थापकीय समस्यांमुळे अनेक कारखाने बंद पडले किंवा त्यांची विक्री झाली. सध्या प्रत्यक्ष गाळप करणाऱ्या सहकारी कारखान्यांची संख्या १०० च्या आत आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यातील ३० ते ३२ कारखाने खासगी व्यवस्थापनामार्फत भाडेतत्त्वावर किंवा सहयोगी तत्त्वावर चालवले जात आहेत. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवर गाळप हंगाम घेणारे सहकारी कारखाने केवळ ७५ च्या आसपासच उरले आहेत.

Sugar Factory
Sharadwat Mukherjee: '...जर मुख्यमंत्र्यांनी हात काढला तर 58 बंडखोर आमदारांचा ग्रुप संपुष्टात येईल!'; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

एनसीडीसी'च्या मदतीनंतरही स्थिती जैसे थे...

मागील दोन वर्षांत राज्य सरकारच्या हमीवर एनसीडीसीमार्फत ३३ सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधींचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. मात्र इतकी मोठी मदत मिळूनही या कारखान्यांची आर्थिक गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा या उद्योगाच्या सद्यःस्थितीची सखोल कारणमीमांसा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज शासनाला भासू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संयुक्त अभ्यासातून एक नवीन आर्थिक मॉडेल तयार केले जाणार असून, या समितीला दोन महिन्यांत आपला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sugar Factory
Sanjay Shirsat: 'माझा राजीनामा म्हणजे खाऊ वाटला का?' संजय राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिरसाटांचा एकनाथ शिंदेंना इशारा?

असे असेल '२०:१०:७०' चे नवीन बायोरिफायनरी मॉडेल?

कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर समिती भर देणार आहे. यामध्ये इथेनॉल, सीबीजी, सहवीज निर्मिती, सौर ऊर्जा हरित हायड्रोजन, शाश्वत विमान इंधन आणि जैव रसायने अशा दहा उपपदार्थांच्या निर्मितीवर आधारित 'एकात्मिक बायोरिफायनरी मॉडेल' तयार करण्याचा विचार सुरू आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकारचा १० टक्के आणि संबंधित कारखान्याचा ७० टक्के आर्थिक सहभाग असलेल्या वित्तीय प्रारूपाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.

समिती नेमका काय अभ्यास करणार?

साखर आयुक्तांच्या नेतृत्वाखालील ही १३ सदस्यीय समिती राज्यातील प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहणार आहे. कारखान्यांवरील कर्जाचा डोंगर, गाळप क्षमता आणि वाढता उत्पादन खर्च यांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक हंगामासाठी स्वतंत्र कॅश क्रेडिट खाते, एस्क्रो खाते, कर्जपुरवठा व वसुली धोरण तसेच पुनरुज्जीवन व पुनर्वसन निधी उभारण्याबाबत ही समिती सरकारला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या अहवालानंतर राज्यातील संकटात सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा चांगले दिवस येणार का, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.