

Manoj Jarange news : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी एक ऑडिओ क्लिप समोर आणत खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये जरांगे यांच्याकडे ५०० कोटी रुपये पोहोचविल्याचा उल्लेख एक महिला करत आहे. त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांच्याविरोधात कॅम्पेन सुरू करण्याबाबतचा उल्लेख त्यामध्ये आहे. एवढेच नाही तर जरांगेंना मदत करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेतेही असल्याचा दावा एक व्यक्ती करत असल्याचेही ऑडिओ क्लिपमध्ये असल्याने खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवत दसरा मेळाव्यात केलेला दावा खरा असल्याचे सांगितले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत आपल्याला ५०० कोटी रुपये पोहचविल्याचे पसरविले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरावे द्यावे, असे म्हटले होते. त्यावर जरांगेंनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत ऑडिओ बॉम्ब टाकला. ही ऑडिओ क्लिप ऑगस्ट २०२४ मधील असल्याचे दिसते.
ऑडिओ क्लिपमध्ये चार ते पाच व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत असल्याचे दिसते. त्यात एक हिंदीतून संवाद साधणारी महिलाही आहे. या व्यक्ती कोण आहेत, कोणत्या राजकीय किंवा सामाजिक संघटनेशी आहेत की आणखी कोण, याबाबत स्पष्टता नाही. निखील, अतुल, राजेश, दरेकर, निरंजन अशा काही नावांचा क्लिपमध्ये उल्लेख झाल्याचे ऐकू येते.
जरांगेंना भाजपमधूनच रसद
ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, जरांगेच्या आरोपांमध्ये मदत करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेतेही आहेत. ही माहिती आहे. हे थर्ड फ्रंटसाठी चालू आहे की फडणवीसांना बदनाम करण्यासाठी आहे, याबाबतची बातमी टाकली आहे, असा दावा या व्यक्तीने केल्याचे ऐकू येते.
पुतळ्यावरून लक्ष हटविण्यासाठी...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला होता. त्यानंतर सरकारविरोधात विरोधी पक्षांसह विविध संघटनांनी रान उठविले होते. हा मुद्दाही ऑडिओ क्लिपमधील चर्चेत आहे. पुतळ्यावरून लक्ष हटविण्यासाठी पोलरायझेशन सारख्या विषयांकडे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे महिला सांगताना ऐकू येते. या चर्चेत लव्ह जिहादही उल्लेख आहे.
महाराष्ट्रद्रोही...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे ३० ऑगस्ट २०२४ रोजी उद्घाटन झाले होते. या बंदराला होत असलेल्या विरोधाबाबतही संबंधितांमध्ये चर्चा झाल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. विरोध करणाऱ्यांबाबत महाराष्ट्रद्रोही, विकासाला विरोध करणारे, विदेशातून मदत असे नॅरेटिव्ह तयार करण्याबाबतची चर्चा या ऑडिओ क्लिपमध्ये संबंधितांमध्ये झाल्याचे संवादातून दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.