

Phulambri Assembly Constituency : शिवसेनेचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार कोणत्या क्षणी काय राजकीय खेळी करतील याचा काही नेम नाही. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात त्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अवघ्या २४२० मतांनी विजय मिळाल्यानंतर सत्तार अलर्ट झाले. गेल्या अडीच-तीन वर्षात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ नव्याने बांधला. मात्र त्यांच्या मनातील धाकधूक अजूनही कायम असल्याचे दिसून येते.
शेजारच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात सत्तार भलतेच सक्रीय झाल्याने अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत. काँग्रेसमध्ये असताना जालन्याचे विद्यमान खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्याशी असलेली त्यांची मैत्री कायम आहे. जिल्हा बँक, दूध संघ व इतर स्थानिक संस्थांमध्ये हे दोघे एकमेकांना कायम मदत करत असतात. याच मैत्रीतून भविष्यातील नव्या राजकारणाची नांदी म्हणून सत्तारांनी भाजपाच्या ताब्यात असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात रस घ्यायला सुरूवात केली आहे.
वडोद बाजार येथे सुरू असलेल्या श्रीविष्णू मंदिराच्या बांधकामासाठी दोन लाख रूपयांची देणगी सत्तार यांनी स्वतः गावात जाऊन दिली. जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल बोरसे यांच्या वतीने प्रत्येकी दीड लाख रुपये, अशी एकूण पाच लाख रूपयांची मदत या सर्वांनी मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द केली.
पैकी बोरसे, पठाडे यांचे कार्यक्षेत्र फुलंब्री मतदारसंघातच आहे. त्यामुळे त्यांनी निधी देण्यात कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु सत्तार यांनी दोन लाखांचा निधी मंदिर बांधकामाला दिल्याने अनेकांनी विविध तर्क लढवायला सुरूवात केली आहे. सत्तार हे आपल्या मतदारसंघात धार्मिक कार्यक्रम, मंदिरांना निधी देण्यात कायम अग्रेसर असतात. पण मतदारसंघाबाहेरील त्यांची ही मदत चर्चेचा विषय ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार सत्तार यांनी वडोद बाजार येथे भेट देऊन मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली होती. यावेळी विश्वस्त व ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांनी आर्थिक मदतीचा शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्णही केला. सिल्लोडनंतर फुलंब्रीतही राजकीय संपर्क वाढविण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू झाल्याने अनेकांना धडकी भरली आहे.
मंदिराला देणगी देण्याच्या निमित्ताने सत्तार यांचा फुलंब्रीतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी वाढलेला संपर्क महत्वाचा मानला जातो आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आपल्या विचारांशी जुळणारे राजकीय सहकारी आणि स्थानिक नेतृत्व बळकट करण्यासाठी त्याचा हा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील कोट्यावधी रुपयाचा निधी आपले समर्थक किशोर बलांडे यांच्या माध्यमातून फुलंब्री विधानसभा मतदारसंघात सत्तार यांनी दिला होता. तसेच किशोर बलांडे यांच्याकडून विधानसभेची पूर्ण तयारी देखील त्यांनी करून घेतली होती. मात्र जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर बलांडे यांनी उमेदवारी मागे घेतली होती.
जे मराठा क्रांती मोर्चामध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांनी विधानसभा निवडणूक लढू नये, असा निर्णय घेतल्यामुळे बलांडे यांनी माघार घेतली होती. मात्र आता 2029 ची विधानसभा निवडणुकीची तयारी त्यांनी आतापासून सुरू केल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.