

Aurangabad District Bank Election News : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुलगा समीर सत्तार यांचा छाननीत बाद झालेला अर्ज अपिलात वैध ठरल्यानंतर वेगाने सुत्रं हलवली. मुलाला जिल्हा बँकेचा अध्यक्ष करण्याच्या दृष्टीने सत्तार यांनी टाकलेले डाव एकापाठोपाठ एक यशस्वी होत आहेत. छाननीत अवैध ठरलेला अर्ज नंतर वैध ठरला आणि आता समीर सत्तार यांची आता थेट बिनविरोध संचालक पदी निवड झाली आहे.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर आणि एकूणच बँकेवर असलेली आपली पकड कायम राहावी यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत सत्तार यांनी पहिला डाव टाकला होता. महायुतीने एकत्र निवडणूक लढवली तरी शिवसेनेचा अध्यक्ष आणि सात संचालक निवडून आले पाहिजे, अशी फिल्डिंग सत्तार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लावली.
विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे उपद्रव मुल्य महायुतीचे सुहास शिरसाट यांना महागात पडू शकते, याचा अंदाज आल्यामुळे जिल्हा बँकेसाठी विधान परिषदेत धोका नको म्हणून भाजपाच्या नेत्यांनी सत्तार यांच्यासोबत तडजोड केली. विधान परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्ज छाननीत समीर सत्तार यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. सत्तार पिता-पुत्रांसाठी हा धक्का समजला जात होता. परंतु जिल्हा बँकेचे राजकारण आणि मतदान प्रक्रियेचा प्रचंड अनुभव असलेल्या सत्तार यांनी त्याच दिवशी आमचा अर्ज अपिलात शंभर टक्के टिकेल, असा दावा केला होता.
विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपिलात अखेर सत्तार यांचा दावा खरा ठरला. दहा अपिलांपैकी एक वगळता इतर सगळ्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज कायम राहिल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी पुन्हा सक्रीय होत मुलाला बिनविरोध संचालक करण्यासोबतच शिवसेनेचे अधिकाधिक संचालक बिनविरोध कसे निवडून येतील, यासाठी भेटीगाठींवर जोर दिला होता. समीर सत्तार यांच्याविरोधातील सर्व उमेदवारांनी कृषी व पणन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून माघार घेतल्याने त्यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. याची अधिकृत घोषणा उद्या निवडणूक निर्णय अधिकारी करतील.
समीर सत्तार यांच्यासह आमदार विलास भुमरे हे यापुर्वीच बिनविरोध संचालक झाले आहेत. तर आज माघारीनंतर आमदार रमेश बोरनारे, मंत्री सुहास शिरसाट तसेच सत्तार समर्थक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अर्जून गाढे हे देखील बिनविरोध संचालक झाले आहेत. काँग्रेस पक्षाचा एक तर भाजपाचे दोन असे आठ संचालक जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. आता 12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत. सत्तार यांनी केलेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी देखील माघार घेतली आहे.
समीर सत्तार यांनी कृषी व पणन प्रक्रिया संस्था मतदारसंघातून आणि वैयक्तिक मतदारसंघातून अर्ज भरले होते. छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी समृद्ध जाधव यांनी दोन्ही अर्ज बाद ठरवले. सोयगाव येथील समीर सत्तार यांच्या मालकीच्या गट क्र. 288 मधील इमारतीत जिल्हा बँकेची शाखा भाडेतत्त्वावर सुरू आहे. त्यामुळे त्यांना भाडे मिळते. ज्या संस्थेची निवडणूक लढवत आहोत त्या संस्थेचे लाभार्थी ठरल्याने नियम 57 नुसार त्यांचा अर्ज अवैध ठरवला गेला.
याशिवाय समीर सत्तार हे ज्या 2 खाजगी जिनिंग व प्रेसिंग संस्थांचे अधिकृत संचालक आहेत, त्या संस्था बँकेच्या थकबाकीदार आहेत. त्यातील एका संस्थेचे नाव अंतिम मतदार यादीतून वगळले होते. काकासाहेब रंगनाथ फरकाडे यांनी हा आक्षेप दाखल केला होता आणि तो निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरला होता. मात्र विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय रद्द ठरवत अपात्रतेचा निर्णय रद्द केला होता.
पडद्यामागे मोठ्या हालचाली...
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मंगळवारी अंतिम मुदत असल्याने आमदार अब्दुल सत्तार, ज्यांच्यावर जिल्हा बँकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपवण्यात आली ते खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बैठकावर बैठका घेतल्या. शिवसेनेचे अधिकाधिक संचालक बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांशी संपर्क साधला गेला. आधी एका हॉटेलमध्ये त्यानंतर थेट जिल्हा बँकेच्या दालनात बसून सत्तार यांनी वेगाने सुत्रं हलवली. परिणामी शिवसेनेनेला पाच संचालक हे बिनविरोध निवडून आणता आले. आता सत्तार यांचा डोळा हा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर आहे. मुलाला अध्यक्ष करूनच सत्तार थांबणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोट्यावधीची उलाढाल, हजारो सभासद असलेली जिल्हा बँक ताब्यात असेल तर मतदारसंघावर पकड कायम राहते हा आतापर्यंतचा अब्दुल सत्तार यांचा अनुभव आहे. गेल्यावेळी सत्तार यांनी पहिल्यांदा जिल्हा बँक ताब्यात घेत तिथे शिवसेनेची सत्ता आणली होती. आता कुठल्याही परिस्थितीत ती आपल्याकडे कायम राहावी, यासाठी सत्तार दंड थोपटून मैदानात उतरले आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2420 मतांनी विजय, मंत्री पदाची संधी हुकली, मतदारसंघातील पंचायत समिती विरोधकांच्या ताब्यात गेल्याने सत्तार अडचणीत सापडले होते. अशातच जिल्हा बँकेची सत्ता गेली तर 2029 चा विधानसभेचा पेपर अधिक अवघड जाईल, हे सत्तार यांनी ओळखले. त्यामुळे कसेही करून जिल्हा बँक ताब्यात ठेवायची यासाठी सत्तार कंबर कसून मैदानात उतरल आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.