

Chhatrapati Sambhajinagar News : सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी काल त्यांच्या निवासस्थानी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस निरीक्षकांना आपल्या घरातून बाहेर जाण्यास सांगितले. 'मी कोणाला भेटणार हे तुम्ही नाही ठरवायचं, ते मी ठरवेन, दिल्ली पोलिसांसारखं वागू नका,' असे म्हणत दिपके यांनी या अधिकाऱ्यांची पोलीस उपायुक्तांकडे तक्रारही केली होती.
यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले असून, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा असा अपमान केल्यामुळे पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. अभिजीत दिपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांचे पोलीस संरक्षण काढून घ्यावे, अशी मागणी या संघटनेने जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अभिजीत दिपके यांना भेटायला मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. दिपके यांना कुठल्याही प्रकारचा त्रास बाहेरच्या व्यक्तींकडून होऊ नये, याची जबाबदारी तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची आहे.
दरम्यान, दिपके यांच्यावर दिल्लीत हल्ला झाला होता, शाईफेक झाली होती, असा कोणताही अनुचित प्रकार इथे घडू नये, हाच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा हेतू होता. एका काळजीतून ते दिपके यांना भेटायला येणाऱ्या लोकांची चौकशी करत होते. एकाच वेळी अनेक लोकांना भेटण्यासाठी पाठवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरले नसते. म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी काही जणांना भेटण्यापासून रोखले.
पण त्याचाच दिपके यांना राग आला आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या वयाच्या पोलीस अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांना घराबाहेर काढले, ही अत्यंत शरमेची बाब आहे. अभिजीत दिपके यांनी तात्काळ त्या पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा पोलीस बॉईज संघटनेनं दिला आहे.
तसेच, दिपके यांचे पोलीस संरक्षण प्रशासनाने काढून घेतले पाहिजे, अशी मागणीदेखील पोलीस बॉईज संघटनेने केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके सध्या छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील आपल्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत. तर दोन दिवसांपूर्वी येथे मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती.
याच बैठकीदरम्यान, 'अभिजीत दिपके यांनी आम्हाला का बोलावले नाही?' म्हणत गुजरातमधील दोन सदस्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर दिपके यांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. भेटायला येणाऱ्या लोकांना संबंधित पोलीस निरीक्षकांनी रोखल्यानंतर दिपके प्रचंड संतापले होते. यातून पुढील प्रकार घडला होता.
यानंतर, पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवत अभिजीत दिपके यांना जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. अभिजीत दिपके यांनी पोलीस उपायुक्तांकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार केली होती. आता पोलीस बॉईज संघटनेने अभिजीत दिपके यांची तक्रार पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.