Chhatrapati Sambhajinagar, 06 May : महायुतीत संभाजीनगरची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळाले. उशीरा का होईना पण शिंदेंनी भाजपचा दबाव झुगारत संभाजीनगर लोकसभेची जागा आपल्याकडे घेत संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः शिंदे संभाजीनगरात आले, शक्ति प्रदर्शनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ते सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील शहागंज भागात झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात संभाजीनगर जिल्हा पूर्णपणे शिवसेनामय (Shivsena) झाला असल्याचा उल्लेख केला. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेत बंड झाले तेव्हा, जिल्ह्यातील बहुतांश आमदार त्यांच्यासोबत गेले. अपवाद फक्त कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांचा होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ही सल शिंदेंच्या मनात कायम होती, ती त्यावेळी सभेत त्यांनी बोलून दाखवली. कन्नड विधानसभा मतदारसंघ लवकरच आपल्या ताब्यात येईल, असा दावा त्यांनी केला होता. याच कन्नड विधानसभा मतदार संघातील गल्लेबोरगाव येथे आज (ता. ०६ मे) शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सभा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी कन्नड ताब्यात घेण्याची भाषा केल्यानंतर त्याला ठाकरे कसे उत्तर देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या आज ग्रामीण भागात दोन सभा होणार आहेत. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उशीरा सुरवात करून प्रचारात आघाडी घेतली आहे. ठाकरे गटाचे खैरे विरुद्ध भुमरे असे या लढतीला स्वरुप प्राप्त झाले आहे.
कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. शिंदे गटाकडून त्यांना अनेकदा पक्ष प्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्याचा दावा केला गेला. पण राजपूत यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार केला. तेव्हापासून सत्ताधारी पक्षाकडून त्यांना टार्गेट केले जात आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात आपण शिंदे गटात प्रवेश केला नाही; म्हणून सूड उगवला जातोय, असा आरोप करत राजपूत यांनी डीपीडीसीच्या बैठकीत फाईल भिरकावली होती. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच थेट कन्नड विधानसभा मतदारसंघ ताब्यात घ्यायचा, असे जाहीरपणे सांगितले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची कन्नड तालुक्यात होत असलेली सभा महत्वाची ठरणार आहे.
Edited by : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.