

BJP-Congress Politics : टिपू सुलतान जंयतीला केलेले विधान काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या अंगलट आले. समाजामध्ये चीड निर्माण झाली, लोक छि-थू करू लागले. यावरून लक्ष हटवण्यासाठी हुशार असलेल्या अमित देशमुख यांनी दहा वर्षांनी लातूरला रेल्वेने पाणी आणल्याचा घटनेला चुकीची दिशा देण्याचा केविलवाणी प्रयत्न केल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले, ही अभिमानाची गोष्ट नव्हती. हे तुमच्या निष्क्रियतेचे सर्टिफिकेट आहे, असा टोला लगावत निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्या आरोपांवर पलटवार केला.
अमित देशमुख यांनी निषेधार्ह वक्तव्य केले आहे. जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम यातून झाले. आता परत नवे वक्तव्य त्यांनी केले. लातूरला रेल्वेने पाणी आणलं त्या मागे षडयंत्र होतं, असं त्यांनी म्हटले आहे. रेल्वेने पाणी आणणे ही अभिमानाची गोष्ट नव्हती. २०१५-१६ मध्ये पाण्याची अडचण होती, तेव्हा देवेद्र फडणवीस यांनी जिथून जवळून पाणी आणणे शक्य आहे, तिथून पाणी आणा, असे आदेश दिले होते. निंलग्यांतून आम्ही लातूरला टँकर पाठवत होतो. आता दहा वर्षांनी तु्म्ही त्याला षडयंत्र म्हणत आहात.
अमित देशमुख हुशार आणि व्यापारी राजकारणी आहे. टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्य हे त्यांनी वोट बँक सांभाळण्यासाठी केले होते. निषेध होतोय, समाजामध्ये चीड आहे हे लक्षात आल्यानंतर अमित देशमुख यांनी विषयांतर करण्यासाठी खालच्या दर्जाचे राजकारण करण्याचे काम केले आहे.
मध्यंतरी त्यांनी व्यक्तिगत टीका करत चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. तेही त्यांना अडचणीचे ठरले. व्यक्तिगत स्वरुपात, चारित्र्यहनन करून नव्या विषयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तो चुकला, तो त्यांच्यावरच उलटला. लातूरच्या सुस्कृंतपणाची त्यांनी ओढलेली चादर बाजूला झाली आणि त्यांचा खरा चेहरा समोर आला, अशी टीका संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.
२०१९ मध्ये निवडणुकीतही तुम्ही असाच प्रयत्न केला. तुम्ही सगळी यंत्रणा माहिती मिळवण्यासाठी कामाला लावली होती, पण तुमच्या हाती काहीच लागले नाही. निवडणूक संपली म्हणून तुम्ही आता तो विषय सोडून दिला. दहा वर्षांनी तुम्ही रेल्वेने पाणी आणलेल्या विषयाला विलासराव देशमुख यांच्या विरोधातील षडयंत्र असल्याचे म्हणालात. त्यांची बदनामी करण्यासाठी ते केले गेले? असाही आरोप केला. तुम्ही तुमच्या मुळ स्वभावाप्रमाणे हा विषय भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१५-१६ ला आपण दुष्काळाला समोर गेलो. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना राबवली. लातूर जिल्ह्याला सर्वाधिक पुरस्कार जलयुक्त शिवार योजनेसाठी मिळाले. साडेपाच मीटरने पाण्याची पातळी वाढली. त्यानंतर वाटर ग्रीडचा प्रस्ताव फडणवीसांनी मंजूर केला. नद्याजोडच्या माध्यमातून पाणी लातूरला आणण्याचा प्रयत्न होता. तुम्ही ज्या सरकारमध्ये मंत्री होता, तेव्हा तुम्ही वाॅटरग्रीडच्या प्रस्तावावर फुली मारली, ती फाईल तुम्ही कचऱ्याच्या पेटीत टाकली.
परत २०२४ मध्ये सरकार आल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा प्रकल्प हाती घेतला. वल्ड बँकेकडून निधी आणला, आज पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या उजणीमधून जे पाणी धाराशीवपर्यंत आले आहे. ते लातूरला आणण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. मागच्या अडीच वर्षात तुम्ही या प्रकल्पाला बाजूला टाकले, निगेटिव्ह रिपोर्ट दिला, चुकीची माहिती दिली,त्याचा हा परिणाम आहे. अमित देशमुख यांनी विषयांतर करणारे वक्तव्य करून टाकलेल्या ट्रॅपमध्ये सगळ्यांनाच आणले. टिपू सुलतानच्या विधानावरून होणारी टीका, त्यावरील लक्ष वळवण्यासाठी केलेले त्यांचे हे नवे विधान असल्याचे निलंगेकर म्हणाले.
लातूर जिल्ह्यात पन्नास टक्के पावसाची तूट आहे, १४५ प्रकल्प कोरडे पडले आहेत, शून्यावर आहेत. लोकांना याची माहिती, संकटाची चाहूल द्यावी लागेल, या विषयावर आपली दिशा एक राहिली पाहिजे. येणारे दिवस फार अडचणीचे आहेत. या संकटाच्या काळात आपण एकमेकांवर आरोप करून राजकारणात गुंतून पडणे आपल्याला बंद करावे लागेल. माझी विनंती आहे, सगळ्या आमदारांनी एकत्र बसून या संकटातून लातूरकरांना बाहेर काढावे लागेल.
पाणी वाचवा रॅलीवर तुम्ही नौटंकी म्हणून टीका केली होती. आज तिच परिस्थिती आहे. जनतेला आपल्या राजकारणात, आरोप-प्रत्यारोंपाशी काही देणेघेणे नाही. लातूरकरांसमोर असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवणे महत्वाचे आहे. जानेवारीत आपल्याला मोठ्या संकटाला समोर जावे लागणार आहे. पक्षाचे जोडे बाहेर ठेवून, लातूरच्या पाण्यासाठी, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपल्याला एकत्र यावे लागेल, असे आवाहनही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
आपण भांडत राहिलो, तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. उलट सगळे एकत्र राहिलो तर सरकारकडून खूप काही मिळवता येईल. अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. सरकार आमचं आहे, याची जाणीव आम्हाला आहे. त्या ताकदीने आम्ही भूमिका भांडू. अमित देशमुखांनी आता राजकारण बाजूला ठेवा, बँकेच्या राजकारणावर मी बोलणार नाही. निवडून आलेले संचालक ते बघतील. आपण लातूरच्या प्रश्नावर एकत्र आले पाहिजे, असेही निलंगेकर म्हणाले. फेब्रुवारीमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाईल, लोक इथे राहणार नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करावे लागेल, याकडेही निलंगेकर यांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.