

Pune News : इंदापूरच्या राजकारणात भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या मयूरसिंह पाटील यांच्यावर काँग्रेसने लगेचच मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने नियुक्तीपत्र देत त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे.
मयूरसिंह पाटील हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, दूधगंगा तालुका दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आहेत. भाजपमध्ये काही काळ काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर लगेचच तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने काँग्रेसने त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि स्थानिक संपर्काचा संघटनात्मक कामासाठी उपयोग करून घेण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
मयूरसिंह पाटील यांचा काँग्रेसशी जुना कौटुंबिक संबंध आहे. त्यांचे चुलते दिवंगत शंकरराव बाजीराव पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार, तर बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. काँग्रेसच्या विचारधारेत वाढलेल्या पाटील यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमधील विचारसरणीशी मतभेद असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने मयूरसिंह पाटील यांची इंदापूरमधील राजकीय भूमिका आता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी काँग्रेसची बांधणी करणे, अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश आणि त्यानंतर तातडीने तालुकाध्यक्षपदाची नियुक्ती, या घडामोडींमुळे इंदापूरच्या राजकारणात मयूरसिंह पाटील यांच्या नव्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.