जालन्यातील माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाला युतीचा प्रस्ताव दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे भास्कर दानवे यांनी हा प्रस्ताव तात्पुरता “वेटिंग”वर ठेवत अधिक चर्चा आवश्यक असल्याचे सांगितले.
या घडामोडींमुळे जालना जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Marathwada Political News : एकीकडे मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आपापल्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मात्र भाजपाकडे जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव दिला आहे. यावर आता भास्कर दानवे यांनी शिवसेनेच्या प्रस्तावावर आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो शिवसेनेला कळवण्यात येईल, असे सांगत हा प्रस्ताव वेटिंगवर ठेवला आहे.
जालना (Jalna) जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या घडामोडी घडल्या. आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. एवढेच नाही तर महापालिकेची निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, मी महापौर आणि सत्ता मिळवून देतो असा दावाच त्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी राज्यातल्या नेत्यांना दिला होता. राज्य पातळीवर महायुतीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही एकत्र लढणार असे सांगत आहेत.
दुसरीकडे मात्र तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे (Shivsena) सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार, कळमनुरीचे संतोष बांगर यांनी जिल्हा परिषद, नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा परस्पर करून टाकली आहे. दुसरीकडे भाजपने युती करायची की स्वबळावर लढायचे? याचा निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार तेथील नेते घेतील, असे स्पष्ट केले आहे.
दानवे-गोरंट्याल ठरवणार..
भाजपचे वरिष्ठ नेते युती किंवा स्वबळाचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक नेत्यांना दिल्याचे सांगत आहेत. तर जालन्याचे भाजपा महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी मात्र शिवसेनेच्या प्रस्तावावर निर्णयाचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात ढकलला आहे. अर्जुन खोतकर यांनी या प्रस्तावाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 20 तारखेपर्यंत भाजपाकडे युतीचा प्रस्ताव द्या, त्यानंतर मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, अशा सूचना दिल्याचे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू असताना खोतकर यांच्या निवासस्थानी उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. युतीसाठी भाजपला दिलेल्या प्रस्तावावर काय निर्णय होतो? यावर शिवसेना आपली पुढील रणनीती आखणार आहे. भास्कर दानवे यांनी तूर्तास शिवसेनेच्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय किंवा भाष्य ठामपणे केलेले नसले तरी कैलास गोरंट्याल आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची मानसिकता जिल्हा परिषद, महापालिका स्वबळावर लढण्याचीच दिसते.
त्यामुळे शिवसेनेचा प्रस्ताव भाजप नेते रावसाहेब दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल हे फारसा गांभीर्याने घेणार नाही असे चित्र आहे. त्यामुळे जालन्यातही महायुतीत तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार सत्तार यांनी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार, असे ठामपणे सांगत भाजपाच्याच विरोधात दंड थोपटले आहे. तर संतोष बांगर यांनी युती केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे म्हणत स्वबळाचा नारा दिला आहे.
1. अर्जुन खोतकरांनी कोणाला युतीचा प्रस्ताव दिला?
त्यांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) युतीचा प्रस्ताव दिला आहे.
2. भाजपची प्रतिक्रिया काय होती?
भास्कर दानवे यांनी हा प्रस्ताव सध्या विचाराधीन ठेवला असल्याचे सांगितले.
3. ही घटना कुठे घडली?
ही राजकीय घडामोड जालना जिल्ह्यातील आहे.
4. खोतकर सध्या कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
ते शिवसेनेचे जालन्याचे आमदार आहेत.
5. या प्रस्तावामुळे काय परिणाम होऊ शकतो?
जालन्यातील आगामी निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.