Nanded Guardian Minister: नांदेडच्या पालकमंत्री पदावरून अतुल सावेंना हटवा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मंत्री संजय राठोडांकडे मागणी

Chhatrapati Sambhajinagar Politics: भाजपाचे खासदार तथा नांदेड जिल्ह्यातील नेते अशोक चव्हाण यांच्याकडून शिवसेनेला फारसे महत्व दिले जात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, महापालिका निवडणुकीतून हे दिसून आले होते.
Atul Save
Atul SaveSarakarnama
Published on
Updated on

Nanded News : प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पालकमंत्री द्या, अशी मागणी सातत्याने राजकीय पक्षांकडून केली जाते. स्थानिक नेता पालकमंत्री असेल तर कामे तातडीने मार्गी लागतात, बाहेरचा पालकमंत्री असेल तर तो फक्त ध्वजवंदनासाठी येतो, असा काहीसा नाराजीचा सूर आळवला जातो.

नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. अतुल सावे हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना योग्य सन्मान देत नाहीत, विकास निधी देताना दुजाभाव करतात असे आरोप करत मंत्री संजय राठोड यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

पालकमंत्री हटवा, अशी थेट मागणीच त्यांनी केल्यामुळे नांदेडमध्ये महायुतीत मीठाचा खडा पडला आहे. भाजपाचे खासदार तथा नांदेड जिल्ह्यातील नेते अशोक चव्हाण यांच्याकडून शिवसेनेला फारसे महत्व दिले जात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, महापालिका निवडणूकीतून हे दिसून आले होते.

राज्यात महायुती असताना या निवडणुका भाजपाने स्वबळावर लढल्या होत्या. तेव्हापासून शिवसेना-भाजप या मित्र पक्षांमध्ये ताणाताणी सुरू आहे. यात आता पालकमंत्री अतुल सावे यांच्यावरील आरोपांची भर पडली आहे. अतुल सावे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे.

Atul Save
Marathwada Politics: 'ठाकरे बंधूं'नी फिरलेलं राजकीय वारं ओळखलं; अमितनंतर आदित्यही मराठवाड्यात,'जेन झीं'च्या साथीनं ढासळलेले बालेकिल्ले पुन्हा बांधणार?

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे पालकमंत्र्यांविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. नांदेड दौऱ्यावर संजय राठोड आले असताना शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आरोपानूसा, पालकमंत्री सावे यांच्याकडून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित सन्मान दिला जात नाही. समन्वयाता अभाव असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्थानिक पातळीवरील नागरी तसेच ग्रामीण विकासकामांबाबत शिवसेनेने केलेल्या मागण्यांना अपेक्षित प्रतिसाद सावे यांच्याकडून मिळत नाही.

Atul Save
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांसमोर विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना भरला दम; तरीही अल्टिमेटम कायम, 28 तारखेला काय होणार?

शिवसेना हा महायुतीचा घटक पक्ष असूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे राठोड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. विकास निधीच्या वाटपाबाबतही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधी देताना भाजपला झुकते माप दिले जाते.

तसेच विविध शासकीय समित्या, प्राधिकरणे आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपेक्षित प्रतिनिधित्व दिले जात नाही, असे लेखी निवेदनच मंत्री संजय राठोड यांना देण्यात आले आहे. यावर राठोड यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे.

नांदेडमधील पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भावना आणि तक्रारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यात येतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल, असा शब्द राठोड यांनी शिवसैनिकांना दिला आहे. मित्रपक्ष शिवसेनेच्या आरोपांवर मंत्री अतुल सावे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com