

Marathwada Politics : नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर देशाची राजधानी दिल्ली 20-22 दिवस 'जेन झीं'च्या आंदोलनाने गाजली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतच तरुण थांबले. दिल्लीत पेटलेला हा वणवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. आजचा युवा किती शक्तिशाली आहे, याची झलक जंतरमंतरवर दिसली आणि सगळेच राजकीय पक्ष तंतरले.
सत्ताधारी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काँग्रेस, डावे हे देशपातळीवरील पक्ष आणि त्यांचे नेते तसेच प्रादेशिक पक्षांनीही 'जेन झी' खुणावू लागले आहेत. महाराष्ट्रात तरुण, विद्यार्थ्यांचे नेतृत्व म्हणून राजकारणात पुढे आलेले युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे या दोन बंधूंनी सध्या आपला मोर्चा 'जेन झीं'कडे वळवला आहे.
राजपुत्र अमित ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवादाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या शिवाय आपल्या पक्षाच्या विद्यार्थी शाखा वाढवण्यावर ते या दौऱ्यात भर देणार आहेत. तर पुढील माहिन्यात आदित्य ठाकरे हे युवासेनेच्या माध्यमातून याच तरुणाईला साद घालण्यासाठी मराठवाडा दौरा करणार आहेत.
सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जेव्हा हजारो तरूण दिल्लीच्या रस्त्यावर उतरूण सरकारच्याविरोधात लढा देत होते, तेव्हा महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी दिल्लीच्या आंदोलनाची थिणगी पेटवली होती. दोन्ही ठाकरे भावांनी तरुणाईला साद घालत आपली छाप पाडली होती.
युवाशक्ती देशात काय घडवू शकते? याचा अंदाज आणि भविष्यात तरुणांच्या जोरावर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना हादरे देण्याचा प्रयत्न आदित्य आणि अमित ठाकरे हे दोन तरुण करू पाहत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याला मोठे वलय आहे. शिवसेना असो मनसे या दोन्ही पक्षांकडे तरुणांचा ओढा सुरूवातीपासूनच आहे.
जंतरमंतरवरील आंदोलनानंतर या तरुणांवर नेत्यांनी फोकस करायचे ठरवले आहे. अमित-आदित्य ठाकरे यांचा मराठवाड्यातील दौरा हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. पुढील महिन्यात म्हणजे 17 सप्टेंबरला म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार असल्याची माहिती आहे.
राजकारणात विरोधकांसाठी झालेली मोठी स्पेस 'जेन झीं'च्या जोरावर भरून काढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न यातून दिसतो. त्याची सुरूवात अमित ठाकरे यांच्या दौऱ्याने सुरू झाली आहे. आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर मराठवाड्यातील राजकीय चित्र बदललेले दिसेल, असे बोलले जाते.
संघालाही जाणीव झाली.. दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाकडे बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जेन झींशी बोललं पाहिजे ही घेतलेली भूमिका त्यांचे महत्व अधोरेखित करते. काँग्रेससह देशातील सगळे विरोधी पक्ष हे 'जेन झीं'ना आपल्याकडे वळवण्याचा कसोशीने करताना दिसत आहे.
राहुल गांधी यांच्या पुणे येथील 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाने सत्ताधारी पक्षांची झोप उडवल्याचे बोलले जाते. देशातला तरुण सरकारविरोधात जाता कामानये यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तरुणाईशी संवाद साधण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.