

Chhatrapati Sambhajinagar ZP Election News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत बहुमताजवळ असलेल्या भाजपाने युती धर्म पाळत शिवसेनेला सोबत घेतले. उपमहापौर पद देत राज्यात एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा परिषदेत हे चित्र बदलले. पहिली अडीच वर्ष अध्यक्ष कोणाचा? या वादातून महायुती तुटली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपाला बायपास करून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण स्थानिक नेत्यांनी चाणक्य नीती वापरून शिवसेनेसह उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही झटका दिला.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका टाॅक शोच्या माध्यमातून शहरवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी एक नवी घोषणा दिली होती, 'ना खान, ना बाण, राखू भगव्याची शान'. ही घोषणा त्यांचे लाडके मंत्री अतुल सावे यांनी खरी करून दाखवली असेच या निमित्ताने म्हणावे लागेल. भाजपावर कुरघोडीचा केलेला प्रयोग अंगलट आल्याने महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही चांगले संख्याबळ असूनही शिवसेना बॅकफुटवर गेली.
2017 मध्ये सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या भाजपाला शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेत सत्तेपासून पाच वर्ष दूर ठेवले होते. तोच प्रयोग अब्दुल सत्तार, विलास भुमरे या शिवसेनेच्या आमदारांनी पुन्हा करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाचे मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण या त्रिमूर्तींनी शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला.
महायुतीच्या फाॅर्म्युला नूसार मिळणारे उपाध्यक्ष पदही गेले अन् सत्तेतूनही बाहेर राहावे लागले. जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेला बसलेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल.
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी देवाभाऊंचा 'ना बाण' चा संदेश भलताच मनावर घेतला. लातूर जिल्हा परिषदेत 36 वरून 18 वर गाडी घसरली असली तरी भाजपाने राष्ट्रवादीच्या मदतीने अध्यक्षपद मिळवलेच.
धाराशिवमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्नी अर्चना पाटील यांना अध्यक्षपदी बसवत सूत्रं आपल्या हाती ठेवली. तिथेही शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांचा अध्यक्षपदासाठीचा डाव भाजपाने हाणून पाडला आणि त्यांना उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले.
परभणीत शिवसेनेच्या सदस्यांची संख्या एक अंकी होती. पाच सदस्य असताना भाजपाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला सोबत घेत असल्याचे जाहीर केले. पण प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अध्यक्ष पद पटकावत इथेही शिवसेनेला सत्ते बाहेर ठेवले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी ऐनवेळी हातमिळवणी केली आणि इथेही जिल्हा परिषदेतून 'ना बाण' चा संदेश पाळला गेला.
मराठवाड्यातील लातूर, परभणी, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर या चार जिल्हा परिषदेपैकी फक्त धाराशिवमध्ये शिवसेनेच्या वाटेला उपाध्यक्षपद आले आहे. लातूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खातेच उघडले नाही, त्यामुळे तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रश्नच नव्हता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र 22 सदस्य म्हणजेच भाजपापेक्षा फक्त दोन ने कमी असताना पक्षातील काही स्वार्थी नेत्यांमुळे शिवसेनेला सत्तेबाहेर राहण्याची वेळ आली. निवडणुकीवर बहिष्कार टाकून शिवसेनेच्या नेत्यांनी काय साध्य केले? हा खरा प्रश्न आहे. या उलट भाजपाने योग्यवेळी योग्य निर्णय घेत महापालिकेनंतर झेडपीमध्येही आपला दबदबा कायम राखला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.