Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. चार) लढतींचे चित्र स्पष्ट झाले. यात महायुतीत अधिक तर आघाडीत कमी बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. आष्टीतून भीमराव धोंडे, बीडमधून अनिल जगताप, माजलगावमधून माधव निर्मळ व बाबरी मुंडे यांचे अर्ज कायम राहीले.
तर, नुकत्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीडमधून अर्ज कायम ठेवला. आष्टी विधानसभा मतदार संघात यापूर्वीच महायुतीत मैत्रीपुर्ण लढत स्पष्ट झाली आहे. भाजपने सुरेश धस तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार बाळासाहेब आजबे यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. येथून भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. बीडमध्ये महायुतीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला जाऊन डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी भेटली आहे. येथून शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप अपक्ष रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे. माजलगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिली आहे. येथून राष्ट्रवादीचे माधव निर्मळ तसेच भाजपचे बाबरी मुंडे यांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले रमेश आडसकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
दरम्यान, बीड मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अचानक माघार घेतली. यासह माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनीही बीडमधून माघार घेतली. केजमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी माघार घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पृथवीराज साठे यांना पाठींबा जाहीर केला.
परळीतून राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राजाभाऊ फड यांनीही माघार घेतली. एकूणच बीड जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीचे पीक उंदड झाल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.