

Beed News : राज्याच्या पोलीस महासंचालकांचा दौरा, त्या पार्श्वभूमीवर अलर्ट झालेली यंत्रणा, दोन दिवसांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचा बीड दौरा असताना पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. मंगळवारी रात्री शहरातील इमामपूरा भागात थेट पिस्तूलमधून अंदाधुंद फायरिंग झाल्याची थरारक घटना घडली.
जुन्या वादातून तीन राऊंड गोळीबार करत दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला अटक केली. तर सहा हल्लेखोर फरार झाले आहेत. बीड शहरालगत असलेल्या इमामपूर रस्ता परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ हा धक्कादायक प्रकार घडला.
जुन्या वादाच्या कारणावरून 'तू आमच्याकडे काय बघतोस'? असा जाब विचारत झालेल्या बाचाबाचीनंतर थेट पिस्तूल काढून तीन राऊंड फायर करण्यात आले. या हल्ल्यात फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एका आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी शेख मोहम्मद साद (वय 22, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) हा त्याच्या मित्रासह इमामपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (ता.11) रात्री थांबला होता. तिथे हजर असलेल्या आरोपी सय्यद साद याने 'तू आमच्याकडे का बघतोस'? असे म्हणत जुन्या वादाचा राग धरून शेख मोहम्मद साद याच्या कानशिलात लगावली.
त्यानंतर या दोघांमध्ये तुफान बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर आरोपी सय्यद साद याने त्याचा मामा सफवान खान मोहम्मद खान (रा. पेठ बीड) याला फोन करून बोलावून घेतले. सफवान खान हा 8 ते 10 जणांच्या टोळक्यासह हातात लाठ्या-काठ्या आणि पिस्तूल घेऊन घटनास्थळी धडकला.
सफवान खान याने जीवे मारण्याच्या स्पष्ट हेतूने स्वतःजवळील पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने एकापाठोपाठ एक तीन राऊंड फायर केले. सुदैवाने गोळ्या हुकल्याने फिर्यादी बचावला. मात्र, त्यानंतर सय्यद साद याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या कानावर प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस आणि अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत फरदीन नावाच्या एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सफवान खान, सय्यद साद, अखलाख यांच्यासह इतर 6 ते 7 अज्ञात आरोपींविरुद्ध बीएनएस आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.